Tokyo Olympic PV Sindhu wins bronze medal: भारताची 'बॅडमिंटन क्वीन' पी.व्ही.सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे सलग दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदकं जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. सिंधूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं चीनच्या बिंग जिओवर २१-१३, २१-१५ अशा सरळ सेटमध्ये मात करत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.
भारताची 'बॅडमिंटनक्वीन' पी.व्ही सिंधूनं जिंकलं कांस्य पदक, चीनी खेळाडूला नमवलं; रचला इतिहास
सिंधूच्या विजयानंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पदक जिंकल्यानंतर सिंधूनं दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेनंही सर्वांची मनं जिंकली आहेत. "देशासाठी तुम्ही ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर पदकाची कमाई करता तेव्हा खूपच आनंद वाटतो. पण सुवर्ण किंवा रौप्य पदकाची कमाई करू शकले नाही याचा खेद व्यक्त करू की आजच्या विजयाचं सेलिब्रेशन करू हे कळत नाही. अशा मिश्र भावना सध्या आहेत. पण लढाई अजून संपलेली नाही. मी आनंदी आहे आणि मला वाटतं मी चांगली खेळले. देशासाठी पदक जिंकणं हे नक्कीच अभिमानास्पद आहे", असं सिंधू म्हणाली.
पॅरिस ऑलिम्पिकचे दिले संकेतटोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं असलं तरी आपलं लक्ष्य आता २०२४ सालच्या पॅरिस ऑलिम्पिककडे असल्याचंही सिंधूनं यावेळी दाखवून दिलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी चांगली कामगिरी करुन सुवर्ण पदक जिंकण्यासाठीचं लक्ष्य डोळ्यासमोर नक्कीच आहे, असं ती म्हणाली.
सिंधूचा चीनच्या बिंग जिओवर दमदार विजयटोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटनमध्ये कांस्य पदकासाठीच्या लढाईत पी.व्ही.सिंधूनं चीनच्या बिंग जिओ हिच्यावर सरळ सेटमध्ये विजय प्राप्त केला. सिंधून आधीच्या सामन्यातील पराभवाला मागे सारत आज दमदार पुनरागमन केलं. सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत सिंधूनं पकड निर्माण केली आणि सामना २१-१३, २१-१५ असा जिंकला.