राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी पद्म पुरस्कारांचे वितरण झालं. यावेळी पॅरा अॅथलिट के वाय वेंकटेश यांनाही पद्म श्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानासाठी वेंकटेश यांचा हा सन्मान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात वेंकटेश हे ज्यावेळी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले तेव्हा एक प्रसंग घडला. वेंकटेश हे राष्ट्रपती कोविंद यांच्या दिशेनं चालत आले आणि पायऱ्या चढू लागले, परंतु वेंकटेश व आपल्यातील अंतर फार असल्याचे राष्ट्रपतींना समजले आणि त्यांनी वेंकटेश यांना पायऱ्यांवरून खाली उतरण्यास सांगितले अन् स्वतःही खाली उतरले. त्यावेळी राष्ट्रपती भवनमध्ये उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
१९९४ साली त्यांनी कारकीर्दिला सुरुवात केली आणि जर्मनीत झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक कमिटी अॅथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला. आता ते निवृत्त झाले असून कर्नाटक पॅरा-बॅडमिंटन संघटनेचे सचिव आहेत.