मेलबर्न : भारताच्या लिएंडर पेस याने वयाच्या ४१व्या वर्षी तरुणांना लाजवेल असा खेळ करीत आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह मिश्र दुहेरीचा किताब पटकावत ‘लय भारी’ कामगिरी केली. या जोडीने गतविजेत्या डॅनिएल नेस्टर (कॅनडा) आणि क्रिस्टिना म्लादेनोविक (फ्रान्स) यांचा १ तास २ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-४, ६-३ असा पराभव केला. भारत-स्वीस जोडीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना अप्रतिम टेनिसचा नजराणा प्रेक्षकांसाठी पेश केला. ४१व्या वर्षी पेसने सातव्या मिश्र दुहेरीचे किताब पटकावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला, तर दोनवेळा निवृत्ती घेऊन कमबॅक केलेल्या हिंगीसचे हे दहावे दुहेरीचे जेतेपद ठरले. पेस आणि हिंगीस जोडीने नेस्टर आणि क्रिस्टिना या जोडीची सर्व्हिस पहिल्या सेटमध्ये एकवेळा, तर दुसऱ्या सेटमध्ये दोनवेळा ब्रेक केली. विशेष म्हणजे पेसने गतवर्षीच ३४ वर्षीय हिंगीससह मिश्र दुहेरीत खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी लगेच ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यात यश मिळविले. पेससह २००३मध्ये आॅस्ट्रेलियन आणि विम्बल्डन ओपनमध्ये मिश्र दुहेरीचा किताब पटकावणारी नाव्रातिलोवा ही अंतिम लढत पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. आयडल नाव्रातिलोवा हिच्या सांगण्यावरून १९९५साली निवृत्ती घेणाऱ्या हिंगीसने पेससह मिश्र दुहेरीत खेळण्याचा निर्णय घेतला होता. या विजयानंतर हिंगीसने मार्टिनाचे आभार मानले. १९९७, ९८ आणि ९९ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीत बाजी मारणारी हिंगीस म्हणाली, पेससह मिश्र दुहेरीत खेळण्याचा सल्ला मार्टिनाने दिला आणि तो यशस्वी झाला. तिचे आभार. २० वर्षांनंतर कोर्टवर खेळताना यशस्वी होईन असे वाटलेही नव्हते, परंतु या विजयाचे आत्मविश्वास दिला.
पेस-हिंगीस ‘लय भारी’
By admin | Published: February 02, 2015 3:25 AM