नवी दिल्ली : उझबेकिस्तानविरुद्धच्या आगामी डेव्हिस चषक लढतीसाठी स्टार खेळाडू लिएंडर पेसचे भारतीय संघातील स्थान कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे पेसचा एके काळचा दुहेरीतील साथीदार आणि भारताचा (न खेळणारा) कर्णधार महेश भूपतीवर पेसच्या स्थानाविषयी अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे, आता अंतिम चार खेळाडूंमध्ये पेस स्थान मिळवतो का, याकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.बंगळुरूमध्ये ७ एप्रिलपासून आशिया ओशियाना गट एकमधील दुसऱ्या फेरीत भारत-उझबेकिस्तान आमनेसामने येतील. या सामन्यासाठी पेस भारताच्या अंतिम संघात असेल की नाही, याचा निर्णय सामन्याच्या दहा दिवसआधी घेण्यात येईल. अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या (एआयटीए) एस. पी. मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यांच्या निवड समितीने सहा खेळाडूंच्या भारतीय संघात चार एकेरी खेळाडू रामकुमार रामनाथन, युकी भांबरी, प्रजनेश गुणेश्वरन आणि एन. श्रीराम बालाजी यांच्यासह दोन दुहेरी खेळाडू रोहन बोपन्ना आणि पेस यांची निवड केली. यानंतर अंतिम संघाची निवड करण्याची जबाबदारी कर्णधारावर आहे, असे एआयटीए महासचिव हिरणमय चॅटर्जी यांनी सांगितले.बोपन्ना-पेस यांच्यात याआधी झालेल्या वादाविषयी विचारले असता, चॅटर्जी म्हणाले, ‘‘खेळाडू जेव्हा कोर्टवर उतरतात, तेव्हा त्यांना केवळ चेंडू दिसत असतो.’’(वृत्तसंस्था) हा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारताच्या संघात देशातील सर्वश्रेष्ठ खेळाडू आहेत. त्यामुळे आता कर्णधाराकडे संधी आहे, की यातील सर्वोत्तम खेळाडूंची अंतिम संघात निवड करावी. आज जर रँकिंग किंवा फॉर्मचा विचार केला, तर दुहेरीसाठी बोपन्ना-पेस ही सर्वोत्तम जोडी आमच्याकडे आहे.- हिरणमय चॅटर्जी, महासचिव एआयटीए
पेसची भारतीय संघात निवड
By admin | Published: March 07, 2017 12:47 AM