ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १३ - मला अन्यत्र कुठेही खेळण्यापेक्षा भारतात खेळण्याचा सर्वाधिक आनंद मिळतो. मी माझ्या करीयरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. मला भारतात जितके प्रेम मिळाले ते आयुष्यभर स्मरणात राहील. आम्हाला पाकिस्तानातही इतके प्रेम मिळाले नाही असे पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाला.
पाकिस्तानसारखे इथेही क्रिकेटप्रेमी लोक आहेत. एकूणच माझ्या क्रिकेट कारकीर्दीत भारतात खेळण्याचा मला आनंद मिळाला असे आफ्रिदीने सांगितले. भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकनेही आफ्रिदीसारखीच प्रतिक्रिया व्यक्त केली.
भारतात नेहमीच सन्मानाची वागणूक मिळते. मी भारत सरकारचे आभार मानतो. इथे सुरक्षाव्यवस्था फारच चांगली आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी नेहमीच भारतात येत असतो पण मला कधी सुरक्षेची धोका जाणवला नाही असे मलिकने सांगितले.
पाकिस्तानी संघ शनिवारी रात्री कोलकात्यात दाखल झाला. सुरक्षेच्या मुद्यामुळे पाकिस्तानी संघाचे भारतातील आगमन लांबले होते.