ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 2 - दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद करून विटंबना करणा-या पाकिस्तानच्या कुस्तीपटूंना भारताचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात होणा-या आशियाई चॅम्पियनशिप कुस्तीस्पर्धेसाठी मुजोर पाकच्या खेळाडूंना व्हिसा नाकारण्यात आल्याचं वृत्त आहे.
भारतात होणा-या आशियाई चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तानच्या कुस्ती संघाला व्हिसा नाकारण्यात आल्याचा दावा पाकिस्तान कुस्ती संघटनेने केला आहे. भारतीय उच्चायुक्ताने पाकिस्तानच्या संघाला व्हिसा नाकारल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. नवी दिल्ली येथे 10 मे ते 14 मे दरम्यान आशियाई चॅम्पियनशिप होणार आहॆ.
पाकिस्तान कुस्ती संघटनेचे सचिव मोहम्मद अश्रफ यांनी भारतात होणा-या पाच दिवसीय आशीयाई चॅम्पियनशिपसाठी संघाला व्हिसा नाकारल्याचा दावा केला आहे. मंगळवारी त्यांनी याबाबत माहिती दिली. याविरोधात आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनेकडे आवाज उठवणार असून भारतात होणा-या स्पर्धांवर बंदी घालावी अशी मागणी करणार असल्याचं सांगितलं.
मोहम्मद इनाम बट्ट आणि मोहम्मद बिलाल यांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती, त्यांच्यासाठी आम्ही व्हिसाचा अर्ज केला पण भारतीय उच्चायुक्ताने पाकिस्तानच्या संघाला व्हिसा नाकारल्याचं त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी स्क्वॉश स्पर्धेसाठीही भारताने व्हिसा नाकारल्याचं वृत्त होतं. क्रिकेटच्या मैदानातही पाकिस्तानी खेळाडूंना भारतातील दरवाजे अगोदरच बंद आहेत.