कराची/नवी दिल्ली : पाकिस्तानला २०२० च्या आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचे अधिकार मिळाले आहेत, पण त्याचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) केले जाऊ शकते. कारण त्यांनी जर या स्पर्धेचे आयोजन आपल्या देशात केले, तर राजकीय तणाव बघता भारताच्या सहभागाबाबत साशंकता राहील.आशिया क्रिकेट परिषदेने (एसीसी) मंगळवारी सिंगापूरमध्ये आपल्या बैठकीमध्ये या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला बहाल केले आणि स्पर्धेचे आयोजन तटस्थ स्थळ असलेल्या संयुक्त अरब अमिरातमध्ये होण्याची पूर्ण शक्यता आहे. श्रीलंका संघाच्या बसवर २००९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त अरब अमीरात पाकिस्तानसाठी घरचे मैदान झाले आहे. ही स्पर्धा आॅस्ट्रेलियामध्ये विश्व टी२० पूर्वी सप्टेंबरमध्ये होईल. राजकीय तणावामुळेच भारताने गेल्यावर्षी झालेल्या या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्येच केले होते.स्पर्धेच्या यजमानपदाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या (पिसीबी) सूत्रांनी सांगितले की, ‘सिंगापूरमध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानने सांगितले की, स्पर्धेचे आयोजन घरच्या मैदानावरच होईल. मात्र एसीसीच्या इतर सदस्यांशी चर्चा करुनच स्पर्धा स्थळाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. शिवाय स्पर्धेदरम्यान पाकिस्तानमधील सुरक्षाव्यवस्था आणि राजकीय स्थिती कशी असेल हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.’ जर पाकिस्तानमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात परिस्थिती सकारात्मक नसेल, तर ही स्पर्धा तटस्थ स्थळी आयोजित केली जाऊ शकेल, असेही पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले. ‘गेल्या वर्षी भारत - पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव वाढल्याने स्पर्धा यूएईमध्ये पार पडली होती,’ असेही पीसीबीच्या सूत्राने म्हटले.याविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले की, ‘पाकिस्तानमध्ये खेळण्याबाबत पूर्ण अधिकार सरकारव अवलंबून असेल. बीसीसीआय पूर्णपणे केंद्र सरकारच्या निर्णयाचे पालन करेल. आमच्या मतानुसार गेल्यावर्षी भारताने ज्याप्रकारे यूएई येथे आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते, त्याचप्रमाणे पाकिस्ताननेही तेथेच स्पर्धा पार पाडावी.’ (वृत्तसंस्था)>पाकने दिला जोरआगामी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन सामन्यांसाठी श्रीलंकेने आपले संघ लाहोर आणि कराची येथे पाठवावे, यावर पाकिस्तानने एसीसी बैठकीत जोर दिला. त्याचप्रमाणे पुढील आशियाई स्पर्धा टी२० स्वरुपात खेळविण्यात येतील असा निर्णय घेतानाच, एसीसी आशियाई आॅलिम्पिक परिषदेना तांत्रिक मदत पुरवेल, यावरही निर्णय घेण्यात आला.
आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 4:23 AM