- विश्वास चरणकर/ऑनलाइन लोकमत
पाकिस्तानचा दिवस असला की ते कोणत्याही संघाला हरवू शकतात असे त्या संघाबाबत बोलले जाते. ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. बुधवारचा दिवस हा त्यांचा होता. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला ८ विकेट्सनी हरवून पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली.
कार्डिफ येथे झालेल्या सामन्यात पहिल्या चेंडूपासून त्यांनी जी सरस कामगिरी केली, त्याला तोड नाही. पाकची गोलंदाजी ही नेहमीच अव्वल दर्जाची राहिली आहे. फलंदाजी मात्र हवामान खात्याच्या अंदाजासारखी बेभरवशाची असते. फिल्डींग हे क्षेत्र पाकिस्तान संघासाठी नेहमीच वाकुल्या दाखवत आले आहे. पण, बुधवारी या संघाने तिन्ही प्रकारात चॅंम्पियन्ससारखी कामगिरी करीत इंग्लंडला नामोहरम करीत चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेपूर्वी इंग्लंडला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजले जात होते, लीगमधील सगळे सामने जिंकून त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती, पण मोक्याच्या क्षणी त्यांनी कच खाल्ली. पाकिस्तानी आक्रमणापुढे इंग्लिश फलंदाज हतबल झाल्यासारखे वाटत होते. आमिर, हसनअली पदार्पण करणारा रईस या सर्वांनी चेंडूचा टप्पा खोलवर ठेवला, शिवाय परफेक्ट ब्लॉकव्होल मध्ये चेंडू टाकल्याने इंग्लिश फलंदाजांच्या धावा आटल्या. हा चक्रव्यूह भेदताना ठराविक अंतराने इंग्लंडने बळी गमावल्याने इंग्लंडचा डाव 211 धावात संपुष्टात आला.
गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावल्यावर फलंदाजांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली. कोणत्याही दडपणाशिवाय त्यांनी पाकिस्तानला ८ गड्यांनी विजयी करून अंतिम फेरी गाठली.
आजच्या विजयाचे श्रेय अर्थातच पाकिस्तानच्या जलदगती गोलंदाजांना द्यायला हवे, क्षेत्ररक्षकांनी त्यांना नाउमेद केले नाही हे महत्वाचे. पाकच्या क्षेत्ररक्षकांनी धावा रोखल्या, मुश्किल झेल घेतले, इतकेच नाही तर दोन फलंदाज धावचित केले. या तोडीचे क्षेत्ररक्षण पाकिस्तानकडून कधीच पहायला मिळत नव्हते. कर्णधार सरफराजने गोलंदाजीतील बदलही चांगले केले.
पाकिस्तान या स्पर्धेसाठी कसाबसा पात्र ठरला होता. स्पर्धेत त्यांचे शेवटचे म्हणजे आठवे मानांकन होते. पहिल्या लढतीत भारताकडून मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांचाही त्यांच्यावरील विश्वास उडला होता. द. आफ्रिकेविरूद्द पावसाच्या कृपेने ते जिंकले तर श्रीलंकेच्या खराब क्षेत्ररक्षकांनी त्यांना सेमीफायनलचा दरवाजा उघडून दिला. पण त्यांनी फायनल गाठली ती स्वतःच्या हिंमतीवर.
सुरूवातीला विजेतेपदाचा दावेदार म्हणून त्यांना कोणीही गृहीत धरले नव्हते. पण आज हा संघ अंतिम फेरीत आहे. हीच तर क्रिकेटची खरी गंमत आहे. गुरुवारी भारताने बांगलादेशला हरवावे आणि भारत विरूध्द पाकिस्तान असा अंतिम मुकाबला बघण्यास जग आतुर झालंय एव्हढं मात्र निश्चित !!