ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 29 - 2019 साली होणा-या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान खेळू शकेल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहेत. त्यामागे कारण आहे पाकिस्तान संघाची सातत्याने होत असलेली गचाळ कामगिरी. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या क्रमवारीमध्ये पाकिस्तानची आठव्या स्थानी घसरण झाली आहे.
पाकिस्तान संघाचे सध्या 89 गुण असून ते दोन अंकांनी बांगलादेशच्या मागे आहेत तर तर दोन अंकांनी वेस्ट इंडिजच्या पुढे आहे. पाकिस्तान संघाच्या क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही, तसेच विश्वचषकात खेळण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा पाकिस्तानच्या गुणांची संख्या फारच कमी आहे, असे आयसीसीने म्हटलं आहे.
30 सप्टेंबर 2017 पर्यंत आयसीसीच्या वन डे क्रमवारीतील टॉप 7 संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील. आयसीसीच्या क्रमवारीत 112 गुण मिळवून टीम इंडिया तिस-या स्थानी आहे तर 116 गुणांसह दक्षिण आफ्रिका दुस-या आणि 120 गुणांसह पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे.
फेब्रुवारी महिन्यात यूएईमध्ये पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी, तीन वन डे आणि एक टी-ट्वेंटी सामन्याची मालिका खेळायची आहे. नंतर मार्च-एप्रिलमध्ये पाकिस्तान वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. तिथे पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन वन डे आणि दोन टी-ट्वेंटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना करायचा आहे.