ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 17 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या निमित्ताने पाकिस्तानला भारताकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे असे मत पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू इमरान खान यांनी व्यक्त केले आहे. पहिल्या सामन्यात भारताने ज्या प्रकारे पराभव केला ते पाहता अंतिम मुकाबला म्हणजे पाकिस्तानला सन्मान परत मिळवण्याची चांगली संधी आहे असे इमरान म्हणाले.
समा या पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. पहिल्या सामन्यात भारताने आपला अत्यंत वाईट पद्धतीने पराभव केला आता आपल्याला वचपा काढण्याची संधी मिळाली आहे असे इमरान म्हणाले. इमरान खान यांना पाकिस्तानचे सर्वोत्तम कर्णधार समजले जाते. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992 साली वर्ल्डकप जिंकला होता.
भारताबरोबरच्या सामन्यात ज्या चुका केल्या त्या चूकांमधून पाकिस्तानने धडा घेतला पाहिजे असे ते म्हणाले. नाणेफेक जिंकली तर, भारताला पहिली फलंदाजीची संधी देऊ नका असा सल्ला त्यांनी सर्फराज अहदमला दिला. भारताकडे फलंदाजांची चांगली फळी असून त्यांनी धावांचा डोंगर उभारला तर आपल्यावर दबाव येईल. अन्य संघांविरुद्ध पहिली गोलंदाजी करण्याच्या रणनितीला यश मिळाले. पण भारता विरुद्ध नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घ्या असा सल्ला त्यांनी दिला.
भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळू असे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने म्हटले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना सर्फराजने आक्रमक क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. युवा खेळाडूंची चांगली कामगिरी हे संघासाठी चांगेल चिन्ह असल्याचे त्याने सांगितले.
फहीम अश्रफ, रुमान रईस आणि फाखार झामान या तिघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पाकिस्तानी संघ मॅच फिक्सिंग करुन अंतिम फेरीत पोहोचलाय या आमिर सोहेलच्या आरोपाबद्दल विचारले असता सर्फराजने आम्ही आता या गोष्टीचा विचार करत नाहीय असे उत्तर दिले.