कार्डिफ : सनसनाटी विजयानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेचा संघ उद्या, सोमवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीतील लढतीत उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी आमने-सामने उभे ठाकणार आहेत. ही लढत एक प्रकारे उपांत्यपूर्व फेरीची लढत असणार आहे.दोन्ही संघांनी सुरुवातीचे सामने गमावले होते; परंतु दोन्ही संघांनी सनसनाटी निकाल लावताना स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले आहे. पाकिस्तानला पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून १२४ धावांनी मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला होता; परंतु त्यांनी जागतिक क्रमवारीतील नंबर वन संघ दक्षिण आफ्रिकेवर सनसनाटी विजय मिळवताना स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले.श्रीलंकेलादेखील दक्षिण आफ्रिकेने ९६ धावांनी नमवले होते; परंतु त्याने शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतावर सात विकेटने विजय मिळवत स्वत:ला सेमीफायनलच्या शर्यतीत स्थान मिळवले. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी मोहम्मद आमिर सोडता सर्वच पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली होती; परंतु त्यांनी त्याची भरपाई दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली. त्यांनी मॅचविनर अॅबी डिव्हिलियर्स आणि हाशीम आमलासारख्यांना स्वस्तात तंबूत धाडले. डावखुरा फिरकी गोलंदाज इमाद वसीम आणि वेगवान गोलंदाज हसन अली यांनी सुरेख गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला ८ बाद २१९ धावांवर रोखले होते. त्यानंतर बाबार आजम आणि शोएब मलिक यांनी पाकिस्तानला आवश्यक धावगतीत पुढे ठेवले. त्यामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईसआधारे १९ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने आफ्रिकेविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे श्रेय चांगल्या गोलंदाजीला दिले होते आणि त्याची गोलंदाजांकडून उद्या श्रीलंकेविरुद्ध अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्याचप्रमाणे पाकिस्तानी संघाला बर्मिंगहॅम येथे पाठीराखे लाभले होते; परंतु उद्या कार्डिफमध्ये असे होण्याची शक्यता नाही. त्याचा किती परिणाम संघावर पडतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. दुसरीकडे श्रीलंकन संघ सुरुवातीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्याने हा संघ कमजोर दिसत होता; परंतु कर्णधार मॅथ्यूज परतल्यानंतर त्याने भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्यास खेळाडूंना प्रेरित केले.इतिहास पाकिस्तानच्या बाजूचापाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी सनसनाटी विजयाची नोंद केल्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास बळावलेला आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यातील विजयाचा प्रबळ दावेदार निवडणे कठीण आहे; परंतु इतिहास पाकिस्तानच्या बाजूचा आहे. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रीलंकेवर तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध १४७ सामने जिंकले आहे त्यात पाकिस्तानने ८४ आणि श्रीलंकेने ५८ सामने जिंकले आहेत. एक सामना टाय ठरला होता तर चार सामन्यांचा निकाल लागला नव्हता. या स्पर्धेत जास्त सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे आणि जर उद्या सामन्यात पाऊस आला तर सेमीफायनलसाठीचा निर्णय रनरेटवर होईल.
पाकिस्तान-श्रीलंकेसाठी ‘करा अथवा मरा’ लढत
By admin | Published: June 12, 2017 1:00 AM