पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानी भालाफेकपटूवर बक्षीसांची बरसात सुरु आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात वैयक्तिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी घरी जाऊन घेतली पाकच्या गोल्डन बॉयची भेट
या कामगिरीनंतर पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी नदीमची त्याच्या गावाकडील घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्याने गोल्डन बॉयला 10 कोटी रुपयांचा धनादेश दिला. याशिवाय मरियन यांच्याकडून या खेळाडूला अलिशान कार देण्यात आली आहे.
फॅन्सी नंबरच्या अलिशान कारसह 10 कोटींच दिलं बक्षीस
गिफ्ट स्वरुपात मिळालेल्या कारची खासियत म्हणजे फॅन्सी नंबर. अर्शद नदीम याने पॅरिसमध्ये जेवढ्या अंतरावर भाला फेकून ऑलिम्पिक रेकॉर्ड सेट केला त्याची झलक कारच्या VVIP नंबर प्लेटवर दिसून येते. हा नंबर आहे ‘पीएके 92.97’ नदीमशिवाय त्याचे कोच सलमान इकबाल बट यांनाही 50 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
मरियम यांनी म्हटलंय की, ‘अर्शद नदीमनं देशाला अविस्मरणीय क्षणाची अनुभूती करुन दिली आहे. ४० वर्षांचा दुष्काळ संपवत त्याने पाकिस्तानला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरुन अर्शद नदीम आणि त्याची आई यांच्यासोबतच्या क्षणाचे खास फोटोही शेअर केले आहेत.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उघडली तिजोरी
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देखील देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा खास गौरव सोहळा आयोजित केल्याचे पाहायला मिळाले. या समारंभात अर्शद नदीम याला 15 कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.
पाकचा ऑलिम्पिकमधील खूप दिवसांचा दुष्काळ संपला
याआधी पाकिस्तानच्या पुरुष हॉकी संघाने 1984 लॉस एंजेलस ऑलिम्पिक गेम्समध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. पाकिस्तानचे अखेरचे ऑलिम्पिक पदक हे 1992 मध्ये आले होते. त्यावेळी पाकिस्तानच्या हॉकी संघाने बार्सीलोना येथील गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते. नदीमच्या अप्रतिम आणि अविस्मरणीय कामगिरीच्या जोरावर वैयक्तिक खेळात पाकिस्तानचा गोल्डचा रकाना भरला गेला आहे.
इतिहास रचत भारताच्या गोल्डन बॉयला टाकलं मागे
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने ऐतिहासिक कामगिरीसह सुवर्ण पदक पटकावले. पुरुष भालाफेक प्रकारात ९२.९७ मीटर अंतर भाला फेकून त्याने ऑलिम्पिकमध्ये नवा रेकॉर्ड सेट केला. त्याची ही कामगिरी गोल्डचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताच्या गोल्डन बॉय नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानायला लावणारी होती.