कार्डिफ : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील अखेरच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला तीन गडी राखून नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दोन जीवदानांचा फायदा घेत पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने झुंजार अर्धशतकी खेळी केली. त्याच जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेने दिलेले २३६ धावांचे आव्हान सात गड्यांच्या मोबदल्यात ४४.५ षटकांत पूर्ण केले. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. सलामीवीर निरोशन डिकवेला ७३ आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूज् ३९ यांच्या भागीदारीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभी करेल, असे चित्र होते. मात्र, मोहम्मद आमीर आणि जुनैद खान यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेला २३६ धावातच रोखले. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अली याने ४३ धावात तीन गडी बाद केले, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा फहीम अश्रफ याने दोन गडी बाद करत छाप सोडली. आमिरने ५३ धावात दोन तर जुनैद याने ४० धावात तीन गडी बाद केले. लंकेचे मधल्या फळीतील चार फलंदाज ६ धावातच बाद झाले. दिनेश चंडीमल याला फहीम याने भोपळा न फोडू देताच तंबूत परत पाठवले. पाकिस्तानच्या संघाला हे माफक आव्हानदेखील मोठे वाटले. सलामीवीर फखर झमन याने अर्धशतक झळकावत पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. झमन याने अजहर अली सोबत ७४ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर नियमित अंतरात पाकिस्तानने गडी गमावले. त्यामुळे ३० षटकापर्यंत पाकिस्तानची धावसंख्या ७ बाद १६२ अशी झाली होती. मात्र, सर्फराज अहमद याने ७९ चेंडूत ६१ धावा केल्या. ३९व्या षटकांत मलिंगाच्या चेंडूवर थिसरा परेरा याने, तर ४१ व्या षटकात प्रसन्ना याने सर्फराजचा झेल सोडला. त्याचाच परिणाम श्रीलंकेला पराभवाच्या रूपाने समोर आला. सर्फराज याने मोहम्मद आमिरच्या साथीने १५ षटकांत ७५ धावांची भागीदारी केली आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला. सामनावीराचा बहुमान पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याला देण्यात आला.तत्पूर्वी श्रीलंकेकडून सलामीवीर निरोशन डिकवेला याने ७३ धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याला इतर खेळाडूंची फारशी साथ लाभली नाही. डिकवेला आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूज् यांनी चौथ्या गड्यासाठी ७८ धावांची भागीदारी केली. मॅथ्यूज् बाद झाल्यानंतर मात्र श्रीलंकेलाच डाव ढेपाळला. सहा धावात चार गडी बाद झाल्याने श्रीलंकेची धावसंख्या मर्यादित राहिली. असेल गुणरत्ने याने ४४ चेंडूत २७ धावांची तर सुरंगा लकमल याने ३४ चेंडूत २६ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेला किमान २३६चा टप्पा गाठता आला. धावफलकश्रीलंका : निरोशन डिकवेला झे. सर्फराज गो. मोहम्मद आमीर ७३, धनुष्का गुणथलिका झे. शोएब मलिक गो. जुनैद खान १३, कुशाल मेंडिस गो. हसन अली २७, दिनेश चंडीमल गो. फहीम अश्रफ ०, अँजेलो मॅथ्युज गो. मोहम्मद आमीर ३९, धनंजय डी सिल्वा झे. सर्फराज गो. जुनैद खान १, असेला गुणरत्ने झे. फखर झमन गो. हसन अली २७, थिसरा परेरा झे. बाबर आझम गो. जुनैद खान १, सुरंगा लकमल गो. हसन अली २६, लसीथ मलिंगा नाबाद ९, नुवान प्रदीप झे. गो. फहीम अश्रफ १. अवांतर १९. एकूण : ४९.२ षटकांत सर्वबाद २३६. गोलंदाजी - मोहम्मद आमीर १०-०-५३-२, जुनैद खान १०-३-४०-३, जुनैद खान १०-३-४०-३, इमाद वसीम ८-१-३३-०, फहीम अश्रफ ६.२ - ०-३७-२, हसन अली १०-०-४३-३, मोहम्मद हाफीज ५-०-२४-०पाकिस्तान : अजहर अली झे.मेंडिस गो. लकमल ३४, फखर झमन झे. गुणरत्ने गो. प्रदीप ५०, बाबर आझम झे. डी सिल्वा गो. प्रदीप १०, मोहम्मद हाफीज झे. प्रदीप गो. परेरा १, शोएब मलिक झे. डिकवेला गो. मलिंगा ११, सर्फराज अहमद नाबाद ६१, इमाद वसीम झे.डिकवेला गो. प्रदीप ४, फहीम अश्रफ धावबाद परेरा १५, मोहम्मद आमीर नाबाद २८, अवांतर २३ एकूण ४४.५ षटकांत ७ बाद २३.गोलंदाजी - लसिथ मलिंगा ९.५-२-५२-१, सुरंगा लकमल १०-०-४८-१, नुवान प्रदीप १०-०-६०-३, थिसरा परेरा ८-०-४३-१, असेला गुणरत्ने ५-०-१९-०, धनुष्का गुणथलिका १-०-२-०, धनंजय डी सिल्वा १-०-३-०अशा रंगणार उपांत्य लढतीइंग्लंडविरुद्ध पाकिस्तान१४ जून, कार्डिफ, वेळ: दुपारी ३ पासूनभारत विरुद्ध बांगलादेश१५ जून, बर्मिंघम, वेळ: दुपारी ३ पासून
पाकिस्तान उपांत्य फेरीत
By admin | Published: June 13, 2017 4:51 AM