ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतावर दणदणीत विजय मिळवणा-या पाकिस्तानी संघाला फक्त आत्मिक समाधानच लाभलेले नसून, त्यांनी घसघशीत कमाई सुद्धा केली आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी आयसीसीने मोठे इनामी रक्कमेचे पारितोषिक जाहीर केले होते. आयसीसीने एकूण 45 लाख अमेरिकन डॉलरचे इनाम ठेवले होते. विजेत्या संघाला 2.2 मिलियन डॉलर तर, उपविजेत्या संघाला 1.1 मिलियन डॉलरचे बक्षीस होते.
अंतिमफेरीत भारतावर 180 धावांनी दणदणीत विजय मिळवणा-या पाकिस्तानी संघाला 14 कोटी रुपये तर, उपविजेत्या भारतीय संघाला 7 कोटी रुपय मिळाले. पाकिस्तानने पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवले आहे. इमरान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने 1992 साली पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रुपाने पाकिस्तानला दुसरे मोठे यश मिळाले आहे. या विजयाने पाकिस्तानच्या आयसीसीच्या क्रमवारीतही सुधारण झाली असून, आठवरुन पाकिस्तानचा संघ सहाव्या स्थानी पोहोचला आहे.
स्पर्धेची उपांत्यफेरी गाठणा-या इंग्लंड आणि बांगलादेशला प्रत्येकी तीन कोटी रुपये मिळाले. इंग्लंडचा पाकिस्तानने तर, बांगलादेशचा भारताने पराभव केला. पावसामुळे दोन सामन्यांवर पाणी सोडावे लागलेल्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेच्या बरोबरीने 58 लाख रुपये मिळाले. आठ देशांच्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेचे आव्हान साखळीतच संपले. गटात तळाला राहिलेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंडला प्रत्येकी 39 लाख रुपये मिळाले.
धोनी, युवीबाबत निर्णय घेण्याची वेळ
इंग्लंडच्या यजमानपदाखाली २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महेंद्रसिंग धोनी व युवराजसिंग यांच्या संघातील भूमिकेवर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.
द्रविडला युवराज व धोनी यांच्या भविष्याबाबत विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला, ‘निवड समिती व संघ व्यवस्थापनाला यावर निर्णय घ्यावा लागेल. त्यांना सांगावे लागेल की, भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी त्यांच्या काय कल्पना आहेत आणि आगामी दोन वर्षांत या दोन्ही खेळाडूंकडून काय अपेक्षित आहे. या दोघांना संघात स्थान राहील की केवळ एकाला स्थान मिळेल?’