ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. ११- भारतीय सरकार जोपर्यंत सार्वजनिकपणे पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सुरक्षेची हमी देत नाही तोपर्यंत पाकिस्तान पुरुष आणि महिला क्रिकेट संघ भारतासाठी रवाना होणार नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शाहरयार खान बोलले आहेत. भारतातील काही संघटना पाकिस्तान संघावर हल्ला करु शकतात त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतीय सरकारकडून सुरक्षेची हमी हवी आहे.
डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार जोपर्यंत सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही भारतात येणार नाही असं शाहरयार खान यांनी स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री चौधरी निसार अली खान यांनी पाकिस्तान संघाला हिरवा कंदील दाखवल्याच्या निर्णयाच त्यांनी स्वागत केलं. मात्र भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी प्रत्येत संघाला वेगळी हमी देऊ शकत नसल्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
अनुराग ठाकूर यांनी कोणत्या एका संघाला वेगळी हमी देऊ शकत नाही असं म्हणलं आहे. मात्र फक्त पाकिस्तान संघाला विरोध होत आहे ही गोष्ट त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही पाकिस्तान संघाच्या परिस्थितीची इतर संघांशी तुलना करु शकत नाही. त्यामुळे आम्ही एका ओळीची सुरक्षेची हमी मागत असल्याचं शाहरयार खान यांनी सांगितलं आहे.
खेळाडूंची कुटुंबदेखील त्यांच्यासोबत असतील त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचादेखील प्रश्न आहे. त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. कोणत्याही कुटुंबाला आपल्या मुलांसोबत अशा वातावरणात जाण्याची भीती वाटेल. कधी लोक भडकतील आणि दगडफेक सुरु करतील तुम्ही सांगू शकत नाही. जेव्हा अशा परिस्थितीची सामना तुम्ही करणार असता तेव्हा कुणीतरी त्याची जबाबदारी घेणं गरजेच असत असंही शाहरयार खान बोलले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट संघ मात्र या निर्णयावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तान संघ भारतात येऊन टी20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यास प्रचंड उत्सुक आहे.