कराची : पाकिस्तानच्या युवा खेळाडूंमधून राष्ट्रीय संघात स्थान मिळविणारा देशातील पहिला शीख क्रिकेटपटू महिंदरपालसिंग हा सचिन तेंडुलकरचा फॅन आहे.वेगवान गोलंदाज महिंदरने सांगितले की, बालपणापासून क्रिकेट खेळण्यासाठी आईवडिलांचे प्रोत्साहन मिळाले. सततच्या मेहनतीमुळे मी आज या स्तरावर पोहोचलो. पाकच्या राष्ट्रीय संघातून खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. मुदस्सर नझर, मुश्ताक अहमद यांनी महिंदरच्या कामगिरीचे कौतुक केले. तो अव्वल ३० खेळाडूंमध्ये सहभागी झाला आहे.महिंदरपाल हा पाकच्या ननकाना साहिब गुरुद्वारात सेवा करतो. सोबत शिक्षण घेत-घेत इथपर्यंत दाखल झाला आहे. सहा भाऊ-बहिणींमध्ये सर्वांत मोठा असलेल्या महिंदरने क्रिकेटसह शिक्षणाकडे सारखेच लक्ष दिले हे विशेष.वकार युनूस याला स्वत:चा आदर्श मानणारा महिंदर गल्लीबोळांत खेळून पुढे आला. पाकचे नाव विश्वात उंचाविण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला. आयुष्यात एकदा तरी सचिनची भेट व्हावी, असेही त्याचे स्वप्न आहे.पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांची महिंदरने मुल्तान क्रिकेट अकादमीत भेट घेतली. त्यांनी महिंदरच्या गोलंदाजीचे कौतुक केले. क्रिकेट टीम वर्क तर शिक्षण सभ्यता आणि संस्कृती शिकविते, असे महिंदर मानतो.महिंदरला पंजाबी गीते आवडतात. तो आवडीचे संगीत ऐकतो व वेळ मिळाल्यास ‘पिके’ आणि ‘थ्री इडियट्स’ हे आमिर खानचे लोकप्रिय चित्रपट वारंवार पाहतो. क्रिकेट व्यतिरिक्त व्हॉलिबॉल हा महिंदरचा आवडता खेळ. योग्यवेळी चांगला गाईड न मिळाल्यामुळे माझा बराच वेळ व्यर्थ गेला, असे महिंदरचे मत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट पूर्ववत व्हावे आणि मला खेळण्याची संधी मिळावी, असे महिंदरला मनापासून वाटते. भारताविरुद्ध खेळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण असेल, असे त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
पाकचा शीख क्रिकेटपटू सचिनचा फॅन!
By admin | Published: December 24, 2016 1:13 AM