ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीसाठी दोन्ही कडच्या खेळाडूंनी जय्यत तयारी केली आहे. कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीमुळे मैदानाबाहेर वातावरण चांगलेच तापले असताना खेळाडूंमध्ये मात्र खेळीमेळीचे वातावरण दिसत आहे. त्याचाच प्रत्यय काल लंडनमधील एका हॉटेलमध्ये आला.
काल भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदच्या कुटुंबाची भेट झाली. यावेळी धोनीने सर्फराझचा मुलगा अब्दुल्ला याला चक्क कडेवर उचलून घेतले. सर्फराझ याचा मुलगा अब्दुल्ला याचा जन्म या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला होता. धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ याच्या मुलाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्यावर क्रिकेटप्रेमींकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
आज होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी ओव्हलच्या मैदानात उतरेल. त्यात अंतिम लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघ समोर असल्याने सामन्याला अधिकच महत्त्व आलंय. अगदी जे क्रिकेटचे नियमित प्रेक्षक नाहीत, अशांनीही वेळात वेळ काढलाय. देवांना नवससायास बोलणे सुरू आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर दोन्ही संघांचे समर्थक एकमेकांवर शेलक्या भाषेत शरसंधान करताहेत. एकंदरीत सामन्यासाठी जबरदस्त माहौल तयार झालाय. मात्र असे असतानाही धोनीने पाकिस्तानी कर्णधाराच्या मुलासोबत दाखवलेल्या आपुलकीमुळे त्याचे कौतुक होत आहे.