ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 6 - चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारताने 124 धावांनी केलेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानी खेळांडूंवर प्रचंड टीका होत आहे. दरम्यान सध्या संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्यावरही टिकेसोबत प्रश्नांचा पाऊस पडत आहे. मात्र मिकी आर्थर यांनी संघाच्या खराब कामगिरीसाठी त्यांची भीती जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. भारताने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या रँकिंमगमध्ये तळाशी पोहोचला आहे.
पाकिस्तान संघ भारतसारख्या बलाढ्य संघांविरोधात चांगलं प्रदर्शन दाखवण्यास कधीपासून सुरुवात करेल असं मिकी आर्थर यांना विचारण्यात आलं होतं. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, "आम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत एकदम खराब खेळत आहोत असं म्हणणं संघाचा अपमान असेल. गतवर्षी आम्ही दोन मालिका जिंकल्या होत्या. यानंतर आम्ही नवव्या क्रमांकावरुन आठव्या क्रमांकावर पोहोचलो होतो. या प्रश्नामुळे खेळाडूंना जे प्रशिक्षण दिलं जात आहे, त्याचा अपमान केला जात आहे".
"हा पराभव पाकिस्तानला मागे घेऊन जाणार नाही, कदाचित या पराभवामुळे संघाला पुढे जाण्याची संधी मिळेल", असा विश्वास मिकी आर्थर यांनी व्यक्त केला आहे. "पराभवातून बाहेर निधत संघावर विश्वास ठेवून खेळाला पुढे घेऊन गेलं पाहिजे", असंही ते बोलले आहेत.
यावेळी मिकी आर्थर संतापलेलेही दिसले. "माझी चिंता खेळाडूंची भीती आहे. त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. खेळाडू एवढ्या तणावात का होते माहित नाही. हा मुद्दा कदाचित मला मेडिकल टीमसमोर उपस्थित करावा लागेल. आम्ही खूपच क्षुल्लक चुका केल्या हा चितेंची विषय आहे. आम्ही सहज गोष्टीही चुकीच्या पद्धतीने केल्या. आम्ही सोपे छेल सोडले. आम्ही विकेट्स दरम्यान चांगले धावलो नाही. आम्ही विकेटकीपरकडे व्यवस्थित थ्रो दिला नाही. गोलंदाजीत वेगळेपण दाखवलं नाही", असा पाढाच मिकी आर्थर यांनी वाचून दाखवला आहे.
वहाबला संघात घेणं माझी चूक -
भारताविरोधात झालेल्या सामन्यात महागडा ठरलेला गोलंदाज वहाब रियाजला संघात घेण्याचा निर्णय मिकी आर्थरनेच घेतला होता. वहाबने 8.4 ओव्हर्समध्ये एकूण 87 धावा दिल्या. जुनैद खानच्या जागी वहाबची निवड करण्यात आली होती. मिकी आर्थर यांच्या निर्णयानंतर पक्षपातीपणा करण्यात आल्याची टीका करण्यात आली होती. मिकी आर्थर यांनी आपली चूक झाल्याचं मान्य केलं आहे.