ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - बेभरवशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शानदार फलंदाजीचं प्रदर्शन करताना भारतासमोर 339 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सलामीवीर फखर जमानने झळकावलेल्या शानदार शतकाने पाकिस्तानसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. फखरने 106 चेंडूत 114 धावा फटकावल्या. अखेर 34 व्या षटकात हार्दिक पांड्याने त्याला रविंद्र जडेजाकरवी झेलबाद केलं.
याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीची काही षटकं भारतीय गोलंदाजांनी चांगली टाकली, ज्यात पाकिस्तानचे फलंदाज चाचपडताना दिसले. मात्र त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला आणि भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. भारताकडून भुवनेश्वरने चांगली गोलंदाजी केली मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. भुवनेश्वर, जाधव आणि पांड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला तर एक फलंदाज धावचीत झाला.
त्यापुर्वी फखर जमानसोबत सलामीसाठी आलेल्या अझहर अलीनेही महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. दोन्ही सलामीवीरांनी शानदार अर्धशतक झळकावत पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली मात्र 23 व्या षटकात अर्धशतकवीर अझहर अली याला धावचीत करण्यात भारताला यश आलं. त्याने 71 चेंडूत 59 धावा काढल्या. याशिवाय पाकिस्तानकडून शोएब मलिकने 12 धावा आणि बाबर आझमने 46 धावा केल्या. त्यांच्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अर्धशतकवीर मोहोम्मद हाफिझ (57) आणि इमाद वासिमने(25) झटपट फलंदाजी करत भारतीय संघासमोर 339 धावांचं आव्हान दिलं.