ऑनलाइन लोकमत
कराची, दि. ११ - पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद जिवंत असल्याचे त्यांच्या मुलाने स्पष्ट केले आहे. डॉक्टरांनी हनीफ मोहम्मद यांना मृत घोषित करण्याची घाई करुन त्यांच्या मुलाला चुकीची माहिती दिली. काही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी हनीफ मोहम्मद यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त दिले होते. सहा मिनिटांसाठी हनीफ यांच्या हृदयाचे ठोके बंद होऊन पुन्हा सुरु झाले.
हनीफ मोहम्मद कर्करोगाने त्रस्त असून त्यांच्यावर कराचीमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आठवडयाच्या सुरुवातीला पाकिस्तानी माध्यमांनी हनीफ मोहम्मद अत्यवस्थ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याचे वृत्त दिले होते.
हनीफ मोहम्मद यांनी १९५२-५३ ते १९६९-७० या कालावधीत एकूण ५५ कसोटी सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करताना बारा शतके झळकवली. हनीफ मोहम्मद यांनी १९६७ साली ब्रिजटाऊनमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध करीयरमधील सर्वोत्तम ३३७ धावांची खेळी केली. त्यांच्या या खेळीमुळे सामना अर्निणीत राहिला. क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळीमध्ये हनीफ यांच्या या खेळींचा समावेश होतो.