ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 14 - पाकिस्तानी क्रिकेट पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले आहे. नव्या घटनेमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान याच्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे आधीच फिक्सिंगमुळे बदनाम झालेल्या पाकिस्तानी क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पीसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी खलिद लतिफ आणि शर्जिल खानवरही पीसीबीकडून कारवाई करण्यात आली होती. मोहम्मद इरफानने 4 कसोटी, 60 एकदिवसीय आणि 20 ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. त्यापैकी 4 कसोटी सामन्यात त्याने 10, 60 एकदिवसीय सामन्यात 83 आणि 20 ट्वेंटी-20 लढतीत 15 बळी टिपले. याआधी 2010 साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या लॉर्डस् कसोटीत पाकिस्तानच्या सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमीर यांनी स्पॉट फिक्सिंग कांड घडवून आणले होते. त्यावेळी या तिघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.