ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - वेस्ट इंडिजमध्ये होणा-या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या १७ सदस्यीय भारतीय संघात मुंबईकर शार्दुल ठाकूर एकमेव नवीन चेहरा आहे. २४ वर्षीय शार्दुल वेगवान गोलंदाज आहे. मायदेशात दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटीमध्ये खेळलेल्या खेळाडूंवर निवड समितीने विश्वास दाखवला आहे.
शार्दुल मूळचा पालघर जिल्ह्यातील आहे. पालघर मुंबईपासून ८७ कि.मी अंतरावर आहे. २०१२ साली शार्दुलने मुंबईच्या रणजी संघात पदार्पण केले. पण पदार्पणात शार्दुलला चमक दाखवता आली नाही. शार्दुलने मुंबईच्या संघात पदार्पण केले त्यावर्षी मुंबईने रणजी करंडक जिंकला पण शार्दुलला चार सामन्यात ८२ च्या सरासरीने फक्त चार विकेट मिळाल्या.
शार्दुलला त्याच्या संघ सहाका-यांनी वजन घटवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शार्दुलने गोलंदाजीवर प्रचंड मेहनत घेतली आणि पुन्हा मुंबईच्या संघात परतला. त्याच्या गोलंदाजीच्या कौशल्यात कमालीची सुधारणा झाली होती. पुढच्या मोसमात त्याने २६.२५ च्या सरासरीने २७ विकेट काढल्या.
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यात १३३ विकेट घेतल्या आहेत. २०१४-१५ च्या रणजी मोसमात विनय कुमारसह शार्दुल सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. शार्दुलने दहा सामन्यात २०.८१ च्या सरासरीने ४८ गडी बाद केले होते.
२०१५-१६ मध्ये शार्दुलने मुंबईकडून सर्वाधिक ४१ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे मुंबईला ४१ वा रणजी करंडक जिंकता आला. २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला २० लाख रुपयांना करारबद्ध केले. पण त्याला फक्त एक सामना खेळता आला.