पॅरिस येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या पॅरा रोवर जोडीनं फायनलमध्ये धडक मारली आहे. अनिता आणि नारायण कोंगनपल्ले ही जोडी PR3 Mixed Double Sculls रोइंग प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत. रिपेचेज फेरीत ७:५४.३३ वेळेसह निर्धारित अंतर पार करत या जोडीनं तिसरे स्थान पटकावले. त्यांचा हा प्रयत्न फायनलमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुरेसा आहे.
पदकाच्या इराद्यानेच जोडी फायनलमध्ये उतरेल
पण पदक जिंकायचे असेल तर त्यांना आणखी जोर लावावा लागणार आहे. अनिता आणि नारायण गोंगनपल्ले कामगिरीत आणखी सुधारणा करून पदक मिळवण्याच्या इराद्याने अंतिम सामन्यासाठी तयार होतील, अशी अपेक्षा आहे. १ सप्टेंबरला दुपारी २ वाजता ही जोडी पदाकाच्या अपेक्षेसह फायनल खेळताना दिसेल.
दक्षिण कोरियात पार पडलेल्या जागतिक रोईंग आशियाई आणि ओशियन ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पात्रता रेगाटा २०२४ स्पर्धेत पॅरा मिक्स डबल स्कल्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. भारताच्या या जोडीने ७:५०:८० वेळ नोंदवत पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवला होता.
अशी जमली ही जोडी
आंध्र प्रदेशमधील नारायण २०१८ पासून रोइंगमध्ये आहेत. पण अनिता आणि नारायण यांनी २०२२ पासून भारतासाठी एकत्र स्पर्धेत उतरण्यास सुरुवात केली. आशियाई क्रीडा २०२३ आणि पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत PR3 प्रकारात पुरुष दुहेरीचा समावेश नव्हता. त्यामुळे मिश्र दुहेरीच्या माध्यमातून स्पर्धेत उतरण्यासाठी नारायण यांना एका पार्टनरची आवश्यकता होती. ते अनिताला पुण्यात भेटले. या भेटीनंतर त्यांनी अनिताला रोईंगच्या या मिश्र दुहेरीतील भारतासाठी अगदी नव्या असणाऱ्या इवेंटसाठी तयार केले.
युट्युबवरुन घेतली खेळाची माहिती, आता पॅरालिम्पिकची फायनल गाठली
अनिताने एका मुलाखतीत म्हटले होते की, नारायण सरांना भेटले त्यावेळी खेळाबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांनी समजून सांगितल्यावर हा खेळ खेळू शकतो असा विश्वास निर्माण झाला. YouTube च्या माध्यमातून खेळ शिकला. त्यानंतर सरावाला सुरुवात केली, असा किस्सा अनिताने शेअर केला होता.