ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १२ - पॅरालिम्पिक स्पर्धेत १५०० मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत चार धावपटूंनी मुख्य ऑलिम्पिकमच्या १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवणा-या धावपटूपेक्षा सरस वेळ नोंदवली आहे. मागच्याच महिन्यात रिओमध्ये मुख्य ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या मॅथ्यू सेंट्रोविटझने तीन मिनिटं ५० सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.
पॅरालिम्पिकमध्ये चौथ्या आलेल्या धावपटूने सुवर्णपदक विजेत्या सेंट्रोविटझपेक्षा चांगली वेळ नोंदवली. शारीरीक व्यंग, अपंगत्व असलेले खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होतात. अल्जेरियाच्या फोउद बाकाने ३.४९.८४ अशी वेळ नोंदवली. सेंट्रोविटझपेक्षाही सरस वेळ नोंदवूही त्याला पदकापासून वंचित रहावे लागले.
३.४९.५९ सेकंदांची वेळ नोंदवणार केनियाच्या हेन्री किरवाने कांस्यपदक मिळवले. इथोपियाच्या तामीरु दीमीसीने ३.४८. ५९ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्य तर अब्देलअतीफ बाकाने ३.४८.४९ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले. पदकाला गवसणी घालणारे हे धावपटू अशंत: अंध आहेत.