पॅरिस - भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमधील शानदार कामगिरी कायम राखली असून, बुधवारी मध्यरात्री क्लब थ्रो खेळामध्ये सुवर्ण आणि रौप्यपदकावर कब्जा केला. धर्मबीर याने आशियाई विक्रम मोडताना एफ-५१ क्लब थ्रो स्पर्धेत सुवर्ण जिंकले, तर प्रणव सूरमा याने रौप्यपदकावर नाव कोरले. यासह या स्पर्धेत भारताचा दबदबा राहिला.जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता धर्मबीर याने स्पर्धेला सुरुवात केली. परंतु, त्याचे सुरुवातीचे चारही प्रयत्न अवैध ठरल्याने भारतीयांवर दडपण आले. पाचव्या प्रयत्नात मात्र धर्मबीरने ३४.९२ मीटरची जबरदस्त फेक केली आणि हीच स्पर्धेतील सर्वोत्तम फेकही ठरली.
यानंतर प्रणवने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ३४.५९ मीटरची फेक करत मिळवलेले दुसरे स्थान अखेरपर्यंत कायम राखले. सर्बियाच्या फिलिप ग्राओवाक याने ३४.१८ मीटरसह कांस्य पटकावले. धर्मबीरने जिंकलेले पदक भारताचे पाचवे सुवर्णपदक ठरले. एका कालव्यामध्ये चुकीच्या पद्धतीने सूर मारल्याने धर्मबीर गंभीररीत्या जखमी झाला होता.
सुवर्ण प्रशिक्षकांसाठी : धर्मबीरमी सुवर्णपदक जिंकून खूश आहे. माझे स्वप्न आज साकार झाले आहे. मार्गदर्शक अमितकुमार सरोहा यांची पदक विजयात मोलाची भूमिका असून हे सुवर्ण मी त्यांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया धर्मबीर याने व्यक्त केली. याच स्पर्धेत धर्मबीरसह अमित यांनीही सहभाग घेतला होता. परंतु, एकीकडे धर्मबीर अव्वल स्थानी राहिला असताना त्याचे गुरू मात्र अखेरच्या स्थानी राहिले. धर्मबीर आणि प्रणव यांनी अमितकुमारच्याच मार्गदर्शनाखाली या खेळाचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे शिक्षक दिनीच माझ्या शिष्यांनी मला सर्वांत मोठी गुरुदक्षिणा दिल्याची प्रतिक्रिया अमितकुमारने व्यक्त केली.
क्लब थ्रो म्हणजे?क्लब थ्रो हा गोळा, थाळी आणि भालाफेकनंतरचा चौथा प्रकार आहे. केवळ पॅरालिम्पिकमध्ये तो खेळला जातो. मुदगलच्या आकारासारख्या बारीक लाकडी दांडुक्याचा खालचा भाग हा धातूचा बनलेला असतो. हा क्लब बोटांच्या साहाय्याने पकडून जास्तीत जास्त दूरवर फेकण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतो. या खेळामध्ये रशियाच्या मुसा तैमाझोव याने २०२३ मध्ये ३६.२२ मीटरची फेक करत विश्वविक्रम नोंदवला.