पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या आखाड्यातून अखेर भारताला पहिले पदक मिळाले आहे. भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावत याने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. त्याने 57 किलो वजनी गटात प्यूर्तो रिकोच्या डिरियन क्रूज याला 13-5 अशा फरकाने पराभूत करत ब्राँझ पदकाला गवसणी घातली. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे सहावे पदक ठरले.
पठ्ठ्यानं 16 वर्षांची कुस्तीची परंपरा कायम राखली
2008 नंतर प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीपटूंनी भारताला पदक मिळवून दिले आहे. अमन याने कुस्तीची ही 16 वर्षांची परंपरा कायम ठेवणारी कामगिरी केली. त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तो फक्त 21 वर्षांचा आहे. भविष्यात त्याच्याकडून आणखी अपेक्षा असतील. युवा पैलवानावर आता शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. गीता फोगाट हिने देखील अविस्मरणीय कामगिरीबद्दल अमन शेहरावतला शुभेच्छा दिल्या आहेत.
तगड्या पैलवानांना आस्मान दाखवतं गाठलं पोडियम
अमन सेहरावत (Aman Sehrawat) याने सेमी फायनलपर्यंत धडक मारत पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये आपल्यातील धमक दाखवून दिली होती. पण सेमीच्या लढतीत त्याला जपानच्या रेई हिगुची याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. हरियाणाच्या या युवा पैलवानाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न धुळीस मिळाले. पण या पठ्ठ्यानं पदकासाठीच्या लढतीत जोर लावत शेवट मात्र गोड केला. या स्पर्धेत त्याने माजी युरोपियन चॅम्पियन नॉर्थ मासेडोनियाच्या व्लादिमिर इगोरोव याला 10-0 तर अल्बेनियाच्या जेलीमखान अबाकारोव याला 12-0 गुणांनी पराभूत करत पदकाच्या शर्यतीत टिकून होता.
भारताच्या खात्यात 6 पदकं, मनूसह पॅरिसमध्ये या खेळाडूंना मिळालं यश
अमनशिवाय मनू भाकर ( 10 मीटर एअर पिस्तूल ), मनु भाकर आणि सरबज्योत सिंग ( 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र टीम इवेंट ), स्वप्निल कुसाळे ( 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स ) आणि नीरज चोप्रा याने भालाफेक क्रीडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती. भारतीय पुरूष हॉकी संघानेही स्पेनला पराभूत करत कांस्य पदकाची कमाई केली आहे.
गत ऑलिम्पिक स्पर्धेच्या तुलनेत आलेख ढासळला!
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाचा आकडा हा टोकियो ऑलिम्पिकच्या तुलनेत वाढेल. एवढेच नाही तर ऑलिम्पिकच्या इतिहासात भारत दुहेरी आकडा पार करेल, अशी अपेक्षा होती. पण अनेक अनपेक्षित निकाल आणि सुवर्ण पदकाशिवाय भारताच्या खात्यात आतापर्यंत फक्त 6 पदकं जमा झाली आहेत. जर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादानं विनेश फोगाट प्रकरणातील निर्णय सकारात्मक दिला. तर भारताच्या खात्यात किमान गत ऑलिम्पिक प्रमाणे 7 पदकं जमा होतील. यातही सुवर्णाची उणीवच असेल.