पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महिला खेळाडूची तिच्या प्रियकराने हत्या केली. ऑलिम्पिकपर्यंत मजल मारणारी खेळाडू रेबेका चेपतेगी जीवनाची लढाई हरली आहे. खरे तर युगांडाची धावपटू रेबेका हिला तिच्या प्रियकराने पेट्रोल टाकून जिवंत जाळले. तिच्या शरीराचा ८० टक्के भाग भाजल्याने तिचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर रेबेकाला केनियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. ३३ वर्षीय रेबेकाने गेल्या महिन्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.
दरम्यान, रेबेकावर रविवारी तिच्या प्रियकराने हल्ला केल्यानंतर तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण रेबेकाला मोठी जखम झाली असल्याने तिचा जीव वाचला नाही. ऑलिम्पियन आणि तिचा प्रियकर यांच्यात जमिनीवरून बराच वाद झाला, त्यानंतर तिच्या प्रियकराने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळले असल्याचे कळते.
जमिनीवरुन वाद
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रेबेकाचा प्रियकर डिक्सन एनडेमाने पेट्रोलने भरलेला मग तिच्या अंगावर ओतला. यावेळी एनडेमालाही किरकोळ दुखापत झाली. युगांडा ॲथलेटिक्स फेडरेशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून रेबेकाच्या मृत्यूची माहिती दिली आहे. महासंघानेही घरगुती हिंसाचाराचा निषेध करत स्टार खेळाडूला न्याय देण्याची मागणी केली आहे. रेबेकाच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीने काउन्टीच्या ॲथलेटिक्स प्रशिक्षण केंद्राजवळ जमीन खरेदी केली होती. रेबेकाने २०१० मध्ये ॲथलेटिक्सचा प्रवास सुरू केला. २०२२ मध्ये अबुधाबी मॅरेथॉनमध्ये ती ऑलिम्पिक पदार्पणासाठी पात्र ठरली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती ४४व्या स्थानावर राहिली होती.
आमची ॲथलीट रेबेका हिच्या मृत्यूची घोषणा करताना आम्हाला खूप दुःख होत आहे. ती घरगुती हिंसाचाराची शिकार झाली. एक महासंघ म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि न्यायाची मागणी करतो. तिच्या आत्म्याला शांती लाभो, असे युगांडाच्या ऑलिम्पिक महासंघाने नमूद केले.