india vs argentina hockey olympics | पॅरिस : न्यूझीलंडचा ३-२ ने पराभव करून विजयी सुरुवात करणाऱ्या भारताच्या हॉकी संघाला दुसऱ्या सामन्यात चांगलाच संघर्ष करावा लागला. एका गोलसाठी तरसलेले भारतीय खेळाडू खचत चालले होते. पण, अर्जेंटिनाने एक गोल करून आघाडी घेतल्याने त्यांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला होता. त्यांची सुरुवात पराभवाने झाली असली तरी विजयाचे खाते उघडण्यासाठी त्यांनी बलाढ्य भारताला कडवी झुंज दिली. अर्जेंटिनाने १-० अशी आघाडी घेतल्यामुळे त्यांनी आक्रमक खेळ न करता बचाव करण्यावर भर दिला. तिसऱ्या क्वार्टरची अखेरची दोन मिनिटे शिल्लक असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्यांना संधीचे सोने करता आले नाही.
तिसऱ्या क्वार्टरअखेरपर्यंत भारताच्या खात्यात भोपळा होता. अर्जेंटिनाने १-० अशी आघाडी कायम ठेवली होती. त्यामुळे पुढची १५ मिनिटे अर्थात अखेरचा चौथा क्वार्टर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. पण, इथेही भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले. सामन्यातील शेवटचे २.०८ मिनिटे उरले असताना भारताला पेनल्टी कॉर्नरच्या रूपात भारताला आयती संधी मिळाली. पुन्हा एकदा हीच संधी भारताला मिळाली. जवळपास दोन मिनिटे कॉपी पेस्ट अर्थात पेनल्टी कॉर्नरसाठी गेले. अखेर पावणेदोन मिनिटे शिल्लक असताना भारताने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. अर्जेंटिनाने भारताच्या गोलला आव्हान देत रिव्ह्यू घेतला पण सुदैवाने भारताच्याच बाजूने निकाल लागला. अखेर १-१ अशा बरोबरीत सामना संपला अन् टीम इंडिया अपराजित राहिली. अर्जेंटिना अद्याप आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
२००४ नंतर प्रथमच भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील ऑलिम्पिकमधील सामना अनिर्णित राहिला. तब्बल ५८ मिनिटे गोलसाठी संघर्ष करणाऱ्या टीम इंडियाने पेनल्टी कॉर्नरमध्ये गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी एकमेव गोल केला. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील आपल्या सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून विजयी सलामी दिली. ऑलिम्पिकमधील आकडेवारी पाहता भारतीय संघ अर्जेंटिनाला नेहमीच वरचढ राहिला आहे. हे संघ ऑलिम्पिकमध्ये अकरावेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने आठवेळा विजय संपादन केला, तर अर्जेंटिनाला एक सामना जिंकता आला. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.