ind vs aus hockey olympic 2024 । पॅरिस : गुरुवारी भारताच्या हॉकी संघाचा विजयरथ रोखण्यात बेल्जियमला यश आले होते. बेल्जियमने टीम इंडियाचा १-२ असा पराभव केला. बेल्जियम विजयासह अव्वल स्थानी गेला तर भारत दुसऱ्या स्थानावर राहिला. भारताने न्यूझीलंड आणि आयर्लंडचा पराभव केला आहे. तर अर्जेंटिनाविरूद्धचा सामना अनिर्णित संपला. आज शुक्रवारी टीम इंडियासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्हीही संघांनी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. कांगारूंच्या सततच्या आक्रमक खेळापुढे भारताच्या बचाव विभागाने चांगली कामगिरी केली. पहिल्या क्वार्टरच्या आठव्या मिनिटाला ऑस्ट्रेलियन खेळाडूने खुल्या मैदानाचा फायदा घेत भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढवली. पण, तितक्यात भारताचा जर्मन धावून आला अन् सुखद धक्का बसला. ११व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नरच्या रूपात गोल करण्याची संधी मिळाली. पण चेंडू वाइड केल्याने धोका टळला. मात्र, त्याच्या पुढच्याच मिनिटाला भारताने एक गोल करून खाते उघडले. ललितने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चकमा देत शानदार गोल केला. पहिल्या क्वार्टरला तीन मिनिटे शिल्लक असताना पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत भारतीय कर्णधार हमनप्रीत सिंगने गोल केला. यासह भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये २-० अशी मजबूत आघाडी घेतली. (ind vs aus hockey olympic 2024 score)
दुसऱ्या क्वार्टरच्या चौथ्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारताचा बचाव विभाग पुन्हा एकदा कांगारूंना वरचढ ठरला. चौथ्यांदा ऑलिम्पिक खेळत असलेला भारताचा गोलरक्षक श्रीजेशने गोल रोखण्यात यश मिळवले. अखेर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या क्वार्टरच्या नवव्या मिनिटाला गोल करता आला. या घडीला भारताकडे २-१ अशी आघाडी होती. पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत ही आघाडी कायम राहिली.
तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला दोन्हीही संघातील शिलेदार आक्रमक दिसले. खरे तर १९७२ च्या ऑलिम्पिकमध्ये शेवटच्या वेळी भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑलिम्पिकमध्ये पराभव केला होता. तेव्हापासून ऑस्ट्रेलियन संघ या मोठ्या व्यासपीठावर नेहमीच वरचढ ठरत आला होता. तिसऱ्या क्वार्टरच्या चौथ्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण गोलची संधी हुकली. पण, पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पायाला चेंडू लागल्याने पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारताला यावेळी रिव्ह्ची मदत झाली. मिळालेल्या संधीचे सोने करून कर्णधार हरमनप्रीत सिंगने सहज गोल करून ३-१ अशी आघाडी घेतली. या क्वार्टरमधील अखेरच्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्यांना गोल करता आला नाही. अखेर हा क्वार्टर ३-१ अशा स्कोअरमध्ये संपला.
भारत ५२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकला
चौथा अर्थात अखेरचा क्वार्टरचा इतिहास लिहिणारा होता. या क्वार्टरमध्ये २ गोलची आघाडी कायम ठेवून विजय मिळवण्याचे आव्हान भारतासमोर होते. चौथ्या क्वार्टरमधील १५ मिनिटांकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले होते. या क्वार्टरच्या सहाव्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण ऑस्ट्रेलियाच्या गोलरक्षकाने चांगला बचाव केला. आठव्या मिनिटाला देखील भारताला गोल करण्याची संधी मिळाली. अभिषेकने गोल केला खरा पण कांगारूंना पंचांनी वाचवले अन् हा गोल अमान्य ठरवण्यात आला. अखेरच्या काही मिनिटांमध्ये ऑस्ट्रेलियाने गोल करून ३-२ असा स्कोअर केला. पण, भारताने ऐतिहासिक विजय नोंदवून १९७२ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाचा ऑलिम्पिकमध्ये पराभव केला. विशेष बाब म्हणजे भारताला विजयी घोषित केल्यानंतरही ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानातच थांबले. सामन्याच्या अखेरीस भारतीय खेळाडूच्या पायाला चेंडू लागल्याचे सांगत ते पेनल्टी कॉर्नरची मागणी करताना दिसले. मात्र, पंचांनी निर्णय देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारतासाठी गोल करणारे शिलेदारअभिषेक (पहिला)हरमनप्रीत सिंग (दुसरा) हरमनप्रीत सिंग (तिसरा)