Neeraj Chopra On Vinesh Phogat : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याने तो मुद्दा चांगलाच गाजत आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला आतापर्यंत केवळ सहा पदके जिंकता आली आहेत. यामध्ये पाच कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. शुक्रवारी अमन सेहरावतने ५७ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. पण, विनेश फोगाटचा मुद्दा अद्याप गाजत आहे. अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशचे वजन अतिरिक्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे भारताच्या तोंडचा घास गेला अन् तिला आता रौप्य पदक मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. ही लढाई न्यायालयात पोहोचली आहे. एकूणच विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्याने भारताच्या हक्काचे एक पदक गेले.
विनेशबद्दल बोलताना भालाफेकपटू नीरज चोप्राने लोकांना खास आवाहन केले. तो म्हणाला की, आपल्या सर्वांना माहित आहे की जर तिला पदक मिळाले तर ते खरोखर चांगले होईल. जर अशी परिस्थिती उद्भवली नसती तर तिला नक्कीच पदक मिळाले असते. पण, मला वाटते की पदक घातल्याचा आनंद वेगळाच असतो. गळ्यात पदक नसते तेव्हा लोक केवळ काही दिवस संबंधित खेळाडूला आठवणीत ठेवतात. चॅम्पियन असे बोलतात पण कांलातराने विसरून जातात. त्यामुळे लोकांनी हे विसरता कामा नये. असे झाल्यास पदक मिळो अथवा न मिळो काही फरक पडत नाही. २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक झाले तर चांगलेच होईल. हे भारतीय खेळांसाठी खूप चांगले असेल. लोकांना खेळ थेट पाहता येतील. इथे पॅरिसमध्ये आमची कामगिरी पाहण्यासाठी लोक लवकर उठतात आणि उशिरा झोपतात.
तसेच नीरज चोप्राने त्याच्या आईच्या (अर्शद नदीमबद्दलच्या) प्रतिक्रियेबद्दल सांगितले की, माझी आई जे काही म्हणते ते अगदी मनापासून असते. प्रत्येक देशातील खेळाडूंचे कुटुंबीय त्यांच्या विजयासाठी प्रार्थना करत असतात. खेळाडू म्हणून आम्ही (भारत आणि पाकिस्तान) नेहमीच एकमेकांसोबत खेळत आलो आहोत पण सीमेवर काय होते ते पूर्णपणे वेगळे आहे. आम्हाला गोष्टी शांततापूर्ण व्हाव्यात असे वाटते, पण ते आमच्या हातात नाही, असेही नीरजने नमूद केले.