paris olympic 2024 news : ऑलिम्पिक २०२४ मध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत झाली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऐतिहासिक कामगिरी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर भारताच्या नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. (neeraj chopra match olympic 2024) टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राला यंदा आपल्या पदकाचा बचाव करण्यात अपयश आले. मात्र, त्याने रौप्य पदक जिंकून भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. ऑलिम्पिक २०२४ च्या भालाफेक प्रकाराच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऐतिहासिक भाला फेकून सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण, गोल्डन बॉय नीरज चोप्रा काही चमत्कार करेल या आशेने तमाम भारतीय त्याला पाहत होते. अखेर पाकिस्तानने सुवर्ण तर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शदने ऐतिहासिक कामगिरी करताना तब्बल ९२.९७ मीटर भाला फेकला. त्याने यासह ऑलिम्पिकमध्ये सर्वात दूर भाला फेकण्याचा विश्वविक्रम केला. भारताचा स्टार नीरज चोप्रा पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला होता. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भाला फेकत हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
नीरज आणि अर्शद यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता या जोडीला त्यांच्या जीवनावर बायोपिक बनवला गेला तर त्याला कोणत्या अभिनेत्याला कास्ट करायला आवडेल याबद्दल भाष्य केले आहे. दोघांनी एकमेकांसाठी अभिनेत्याची निवड केली. नीरज चोप्रा म्हणाला की, नदीमची उंची चांगली आहे, त्यामुळे त्याच्या बायोपिकमध्ये आम्ही तरूण असतानाचे अमिताभ बच्चन योग्य असतील असे मला वाटते. तर अर्शद नदीमला नीरजच्या बायोपिकबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, शाहरूख खान नीरज चोप्राच्या बायोपिकसाठी योग्य पर्याय असेल.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली.