Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : पुरूषांच्या १० मीटर एअर रायफल फायनलमध्ये भारताचा अर्जुन बबुता अखेर चौथ्या स्थानी राहिला अन् पदकाला मुकला. अर्जुन बबुता सुरुवातीच्या काही शॉट्सनंतर चौथ्या स्थानावर होता. मग त्याने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. एक कमजोर शॉट खेळल्यानंतर चांगले पुनरागमन करून अर्जुनने दुसरे स्थान गाठले. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील खेळाडूंमध्ये संघर्ष होत राहिला. पण, चीनचा खेळाडू मोठ्या फरकाने अव्वल स्थानी कायम होता. अखेरचे चार खेळाडू स्पर्धेत जिवंत असताना भारताचा अर्जुन चौथ्या स्थानी होता. अर्जुन आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या खेळाडूमध्ये केवळ एक गुणाचा फरक होता. पण, शेवटच्या शॉटमध्ये अर्जुन अपयशी ठरल्याने त्याला चौथ्याच स्थानावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत अर्जुनने २०८.४ गुणांचा वेध घेत चौथे स्थान पटकावले. चीन आणि स्वीडनच्या खेळाडूने अनुक्रने सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
भारताचा नेमबाज अर्जुन बबुताने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत रविवारी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अर्जुन पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहिला होता. भारताचा आणखी एक शिलेदार संदीप सिंगनेही या स्पर्धेत भाग घेतला होता पण तो ६२९.३ गुणांसह १२व्या स्थानावर राहिला अन् पुढच्या फेरीला मुकला. अर्जुनला एकूण ६३०.१ गुण मिळाले होते. भारताच्या अर्जुन बबुताने चांगली सुरुवात केली आणि १०.८ च्या सर्वोत्तम स्कोअरसह १०५.७ गुण मिळविण्यात यश मिळवले. दुसऱ्या सीरिजमध्ये अर्जुनच्या गुणांमध्ये थोडी घसरण झाली. तो फक्त १०४.९ गुण मिळवू शकला. पण अर्जुन पहिल्या ८ मध्ये राहण्यात यशस्वी झाला. अव्वल आठ खेळाडू फायनलसाठी पात्र ठरले.
दरम्यान, रविवारी भारताला पहिले पदक मिळाले. महिला नेमबाज मनू भाकरने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यंदाच्या ऑलिम्पिकचे सीन नदीद्वारे ऐतिहासिक उद्घाटन झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा झाला. नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. यांसह, ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. अंतिम फेरीत मनूने २२१.७ गुणांचा वेध घेत तिसरे स्थान पटकावले. जिन ओह आणि येजी किम या दक्षिण कोरियन नेमबाजांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले.