Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : भारत यंदाच्या ऑलिम्पिकमधील आपल्या पहिल्या सुवर्ण पदकाच्या प्रतीक्षेत आहे, तर पाकिस्तानला अद्याप एकही पदक जिंकता आले नाही. भारताने तीन कांस्य पदक जिंकली आहेत, तर शेजाऱ्यांच्या खात्यात भोपळा आहे. पण, मंगळवारी झालेल्या भालाफेक प्रकाराच्या पात्रता फेरीत दोन्हीही देशातील खेळाडूंना यश आले. ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत ८४ मीटर भाला फेकल्यास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. हे अंतर गाठणारा खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतो. भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीप यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ८ ऑगस्ट रोजी हे दोघेही शिलेदार पदकासाठी मैदानात असतील. एकूणच फायनलमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत पाहायला मिळेल. कारण नीरज पदकाचा प्रबळ दावेदार असला तरी अर्शदने चांगली कामगिरी करत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले.
भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा नीरज चोप्रा पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या फायनलचे तिकीट मिळवण्यात त्याने यश मिळवले. मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
नीरज चोप्राची पदकाच्या दिशेने वाटचाल
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८६.८५ मीटर भाला फेकून फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. त्याने देखील पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्येही अर्शदने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तो पहिल्या तीनमध्ये न आल्याने त्याला पदक जिंकता आले नाही. दुसरीकडे भारताच्या नीरज चोप्राने ८७.५८ भाला फेकून सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. पाकिस्तानचा अर्शद नदीम ८४.६२ मीटर एवढ्या अंतरासह पाचव्या क्रमांकावर राहिला होता.
अर्शद नदीम फायनलमध्ये