Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : सध्या पॅरिसच्या धरतीवर ऑलिम्पिकचा थरार रंगला आहे. भारताची बॅडमिंटनपटू ऑलिम्पिकमध्ये पदाकांची हॅटट्रिक मारण्याच्या इराद्याने मैदानात आहे. महिला एकेरित आज तिचा सामना इस्टोनियाच्या क्रिस्टीना कुबासोबत झाला. पहिल्या सामन्याप्रमाणे आजही सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली. याआधी सिंधूने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली होती. सिंधूने पहिल्या गेममध्येच आपली चमक दाखवली. तिने १४ मिनिटांत पहिला गेम आपल्या नावावर केला. २१-५ अशा फरकाने सिंधू कुबाला वरचढ ठरली. (pv sindhu olympics 2024)
संपूर्ण सामन्यात सिंधू प्रतिस्पर्धी खेळाडूला वरचढ ठरली. तिने दुसरा गेम २१-१० असा जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला. सिंधूने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. आजच्या विजयामुळे पीव्ही सिंधूने उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दरम्यान, पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये पदकाची हॅटट्रिक मारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिने याआधी रौप्य आणि कांस्य पदक जिंकण्यात यश मिळवले आहे.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने मालदीवच्या खेळाडूला नमवून विजयी सलामी दिली होती. रविवारी पीव्ही सिंधू आणि मालदीवचा फातिमथ नब्बाह अब्दुल रज्जाक यांच्यात सामना झाला. पीव्ही सिंधूने पहिला गुण मिळवून सामन्याला सुरुवात केली अन् ती आघाडी कायम ठेवली. मालदीवच्या खेळाडूनेही चांगली सुरुवात केली होती. पण अनुभवी सिंधूने पहिला गेम २१-९ असा जिंकला तर दुसऱ्या गेममध्ये २१-६ ने विजय मिळवला. सिंधूने अवघ्या २७ मिनिटांत हा सामना संपवून आपले वर्चस्व कायम ठेवले.