Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनने साखळी फेरीत विजय नोंदवत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला संघर्ष करत असलेल्या सेनने अखेर लक्ष्य गाठत विजयाला गवसणी घातली. पहिला गेम लक्ष्यने सहज जिंकला होता, मात्र दुसऱ्या गेममध्ये थोडा संघर्ष करावा लागला. भारताच्या शिलेदाराने लक्ष्य गाठताना ग्वाटेमालाच्या केविन गॉर्डनचा २१-८, २२-२० असा पराभव केला. कॉर्डन मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीचा खेळाडू राहिला आहे. याशिवाय टेबल टेनिसमध्ये भारताच्या हरमीत देसाईची कामगिरी उत्कृष्ट राहिली. हरमीत देसाईने जॉर्डनच्या झायेद अमानचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला.
टेबल टेनिसच्या प्राथमिक फेरीत देसाईने जॉर्डनच्या खेळाडूचा सहज पराभव करताना ४-० असा विजय नोंदवला. पण, पुढील फेरीत त्याच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्याचा सामना मायदेशात खेळत असलेल्या फ्रान्सच्या फेलिक्स लेब्रुनसोबत होणार आहे. त्यामुळे फ्रान्सच्या या नामांकित खेळाडूला भारतीय शिलेदार पराभवाची धूळ चारतो का हे पाहण्याजोगे असेल.
मनू भाकर फायनलमध्ये
ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले. पण, शूटिंगमधून एक आशावादी बातमी समोर आली. खरे तर भारताची शूटर मनू भाकर पहिल्या तीनमध्ये येऊन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता ती अंतिम फेरीत खेळेल. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत मनू भारतासाठी पदक जिंकेल अशी आशा आहे.
मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. सातत्य दाखवत तिने नेमबाजी करताना तिसरे स्थान पटकावण्यात यश मिळवले. अव्वल स्थानी राहिलेले आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र होतात. मनूला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले मात्र, भारताची दुसरी नेमबाज रिदम संगवानच्या पदरी निराशा पडली अन् तिला १५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.