Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पहिल्या फेरीत 'लक्ष्य' गाठूनही त्याला पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसते. त्याने पहिला सामना जिंकला असला तरी तो विजय अमान्य असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. त्याने शनिवारी पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन स्पर्धेत ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डनवर विजय मिळवला होता. पण, लक्ष्यचा हा विजय अवैध ठरला आहे. याचे कारण म्हणजे केविन कॉर्डन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्याच्या दुखापतीचा फटका सेनला बसला.
एकूणच लक्ष्य सेनने पहिला सामना जिंकला असला तरी त्याचा विजय मोजला जाणार नाही. त्यामुळे लक्ष्य सोमवारी पुन्हा एकदा त्याचा पहिलाच सामना खेळेल. आता भारतीय शिलेदाराला आणखी एक सामना खेळावा लागणार आहे. जे. क्रिस्टीविरुद्धचा चुरशीचा सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचे भवितव्य ठरवेल.
दरम्यान, लक्ष्य सेनने साखळी फेरीत विजय नोंदवत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला होता. दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला संघर्ष करत असलेल्या सेनने अखेर लक्ष्य गाठत विजयाला गवसणी घातली होती. पहिला गेम लक्ष्यने सहज जिंकला होता, मात्र दुसऱ्या गेममध्ये थोडा संघर्ष करावा लागला. भारताच्या शिलेदाराने लक्ष्य गाठताना ग्वाटेमालाच्या केविन गॉर्डनचा २१-८, २२-२० असा पराभव केला होता. दुखापतीमुळे बाहेर झालेला कॉर्डन मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीचा खेळाडू राहिला आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला रविवारी पहिले पदक मिळाले. मनू भाकरने नेमबाजीत कांस्य पदक जिंकण्याची किमया साधली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकापासून दूर राहिलेल्या मनूने यावेळी स्वप्न पूर्ण केले.