Paris Olympic 2024 Updates In Marathi : भारताची नेमबाज मनू भाकरने आपल्या देशाला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिले पदक जिंकून दिले. तिने १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत कांस्य पदक जिंकले. मनूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारताच्या या लेकीच्या खेळीला दाद दिली. पण, दुसरीकडे राजकारणही तापल्याचे दिसते. मनू भाकरचा हरयाणाचे तत्कालीन मंत्री अनिल विज यांच्यासोबत झालेला वाद आणि त्याबद्दलच्या जुन्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचाच दाखला देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तत्कालीन मंत्र्यावर टीका केली.
खरे तर मनू भाकरने ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. मनू भाकरच्या विजयानंतर आनंद व्यक्त करत अनिल विज यांनी बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. युवा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल मनू भाकरचे अभिनंदन. सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल मनूला राज्य सरकार २ कोटी रुपयांचे रोख बक्षीस देत आहे. पूर्वीची सरकारे फक्त १० लाख रुपये देत असत, असे तत्कालीन मंत्री अनिल वीज यांनी म्हटले होते.
२०१९ मध्ये अनिल विज यांनी जाहीर केलेल्या बक्षिसावर व्यक्त होताना मनूने सांगितले होते की, सर, हे खरे आहे की केवळ घोषणा आहे. याची खात्री करायला हवी. त्यावेळी मनूने तिच्या पोस्टसोबत विज यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. मनू भाकरची ही पोस्ट पाहताच तत्कालीन मंत्री अनिल विज चांगलेच संतापले. संतप्त प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, खेळाडूंना शिस्त असली पाहिजे. हा वाद निर्माण केल्यामुळे मनू भाकरने माफी मागायला हवी. तिला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तिने फक्त तिच्या खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. दरम्यान, आता मनूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच अनिल विज यांनी तिचे कौतुक केले. मात्र, जुनी पोस्ट व्हायरल करत खासदार चतुर्वेदी यांनी त्यांना डिवचले.
२०१९ मधील हरयाणा सरकारचे तत्कालीन मंत्री यांना आता लाज नसल्यासारखे मनू भाकरच्या कांस्य पदक जिंकण्याचे श्रेय घ्यायचे असावे असे दिसते, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले.