Vinesh Phogat News : विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने जपानची दिग्गज खेळाडू सुसाकीविरूद्ध विजय संपादन केला. जपानच्या या पैलवानाला पराभूत करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. विनेशने मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूचा पराभव केला. विनेशने सुरुवातीच्या फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन आणि ४ वेळा जागतिक चॅम्पियन राहिलेली युई सुसाकीला ३-२ अशा फरकाने पराभूत केले. विनेशला विजयी घोषित करताच जपानच्या खेळाडूने पंचांची मदत घेत २ गुण नसल्याचा दावा केला. पण, निकाल विनेशच्याच बाजूने लागला अन् विजयावर शिक्कामोर्तब झाला.
विशेन फोगाटकडून पराभूत झालेली जपानची खेळाडू चारवेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिली आहे. ती २०१० पासून कधीच पराभूत झाली नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा असलेल्या जपानच्या महिला पैलवानाला अखेर विनेशने अस्मान दाखवले. विजयानंतर विनेश फोगाटचे हावभाव सर्वकाही सागंत होते. तिला विजयानंतर अश्रू अनावर झाले.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने मागील रविवारी पदकाचे खाते उघडले.तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.