Antim Panghal out of Paris Olympic:पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये बुधवारचा दिवस भारताचा दिवस सर्वात वाईट ठरला. अशातच भारतीयकुस्तीसाठीच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगटला अपात्र ठरवल्यानंतर आता महिला कुस्तीपटू अंतिम पंघलसाठी एक वाईट बातमी आली आहे. पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारी भारताची कुस्तीपटू अंतिम पंघलवर पॅरिस ऑलिम्पिक व्यवस्थापनानं कारवाई केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, कुस्तीपटू अंतिम पंघल आणि तिच्या बहिणीला पॅरिसमधून हद्दपार केले जाणार आहे.
भारतीय कुस्तीपटू अंतीम पंघलची पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजची मान्यता रद्द करण्यात आली असून तिला पॅरिस सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिमच्या बहिणीला तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी चुकीचे ॲक्रिडेशन कार्ड वापरून ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये प्रवेश करताना पकडल्याने ही कारवाई करण्यात आली. अंतिमची बहीण निशा पंघल हिला पॅरिस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र नंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या सगळ्यात हस्तक्षेप केला आणि निशाला इशारा देऊन सोडण्यात आलं. या घटनेनंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अंतिमला प्रशिक्षक, भाऊ आणि बहिणीसह पॅरिस सोडण्यास सांगितले आहे.
महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील अंतिम फेरीत पहिल्याच वेळी पराभव झाल्यानंतर अंतिम पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आणि तिचे प्रशिक्षक भगतसिंग आणि विकास हे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे गेली. त्यावेळी अंतिम पंघलने तिचे अधिकृत ओळखपत्र तिची लहान बहीण निशाला ऑलिम्पिक व्हिलेजमधून तिचे काही सामान आणण्यासाठी दिलं होतं. मात्र तिला तिथल्या सुरक्षारक्षकांनी निशाला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने वेळीच हस्तक्षेप केल्याने निशाची सुटका झाली.
दरम्यान, पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अंतिमचा प्रवास पहिल्याच सामन्यात संपुष्टात आला. ५३ किलो वजनी गटातून खेळताना पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात अंतिम ०-१० ने पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडली. अवघ्या १०१ सेकंदांमध्ये अंतिम पराभूत झाली.