swapnil kusale olympics 2024 : ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदक जिंकणारा महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे. त्याने नेमबाजीमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली. पदक जिंकताच त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. अलीकडेच कोल्हापुरात आलेल्या स्वप्नीलचे भव्य स्वागत करण्यात आले. आता स्वप्नीलने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीचा अनुभव सांगितला आहे. मोदींनी त्याच्याशी मराठीत संवाद साधला असल्याचे स्वप्नील सांगतो. आपल्या मातृभाषेत बोलणे हा वैयक्तिक स्पर्श असतो. पंतप्रधानांनी देखील माझ्याशी मराठीत संवाद साधला, असे सांगताना स्वप्नीलने पंतप्रधानांचे कौतुक केले.
स्वप्नीलने आणखी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक खेळाडूकडे लक्ष देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणारा कोणताही संवाद तुमच्यात सकारात्मक ऊर्जा भरत असतो. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. जेव्हा मला त्यांचा कॉल आला तेव्हा त्यांनी मला मराठीतून शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे ते शब्द ऐकून मला खूप बरे वाटले. ते प्रत्येक खेळाडूला ओळखतात आणि प्रत्येक खेळाडूला खूप जवळून पाहतात आणि त्यांची काळजी घेतात.
स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नेमबाज स्वप्निल कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. ६ ऑगस्ट १९९५ मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे. अभिनव बिंद्राला २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने १२वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. २००९ मध्ये वयाच्या १४व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. स्वप्नील सुरेश कुसाळे या ग्रामीण भागातील खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. महाराष्ट्रातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखांची मदत केली. सध्या रेल्वेमध्ये टि.सी असणारा स्वप्नील पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत होता. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरल्यानंतर तो दिल्ली येथील रेंजवर सरावासाठी गेला होता.