swapnil kusale railway promotion : मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने ऐतिहासिक कामगिरी करून ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. भारताला शूटींमधून आणखी एक पदक मिळाले असून, एकूण तीन पदकांची नोंद झाली आहे. कोल्हापूरच्या पठ्ठ्याने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले. मूळचा कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्नील कुसाळेने बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. (swapnil kusale in final) अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते. पण, अखेरच्या काही क्षणांमध्ये स्वप्नील इतर पाच खेळाडूंना वरचढ ठरला आणि त्याने तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली.
स्वप्नीलने पदक जिंकताच भारतीय रेल्वेने त्याचे डबल प्रमोशन केले. २०१५ पासून स्वप्नील भारतीय रेल्वेत कार्यरत आहे. तेव्हापासून त्याचे एकदाही प्रमोशन झाले नव्हते. तब्बल नऊ वर्षे पाठपुरावा करूनही त्याच्या हाती काहीच लागत नव्हते. पण, आता पदक जिंकताच रेल्वेने त्याचे डबल प्रमोशन केले. स्वप्नीलचे डबल प्रमोशन झाल्याची माहिती त्याच्या कोच दिपाली देशपांडे यांनी दिली. खरे तर मध्ये रेल्वेमध्ये विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून स्वप्नीलची नियुक्त करण्यात येणार आहे.
स्वप्नीलचा पदकावर निशाणा ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून फक्त खाशाबा जाधव यांच्या नावाची नोंद होती. यात आता भर पडली असून तब्बल ७२ वर्षांनंतर स्वप्नीलच्या रूपात मराठमोळ्या खेळाडूला पदक जिंकण्यात यश आले. स्वप्नील हा कोल्हापूर येथील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावातील रहिवासी आहे. २९ वर्षीय स्वप्नीलने २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र, ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला १२ वर्षे वाट पाहावी लागली. धोनीला आदर्श मानणाऱ्या स्वप्नीलने कॅप्टन कूलच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट अनेकदा पाहिला. दरम्यान, १९५२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले होते. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू बनण्याची संधी स्वप्नीलने मिळवली आहे.