पॅरिसला प्रेमाचे शहर म्हणून ओळखले जाते. जगभरातील जोडपी येथे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी येतात. इथेच ऑलिम्पिक २०२४ चा थरार रंगला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदकांसाठी खेळाडूंमध्ये चढाओढ सुरूच आहे. अशातच शुक्रवारी बॅडमिंटन कोर्टवर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यानंतर लियू युचेनने त्याची सुवर्ण पदक विजेती प्रेयसी हुआंग याकिओंगला लग्नासाठी प्रपोज केले. चीनची बॅडमिंटन स्टार हुआंग याकिओंगने पॅरिस ऑलिम्पिकमधून सुवर्ण पदकासह एंगेजमेंट रिंगही मिळवली.
३० वर्षीय याकिओंगने झेंग सी वेईसोबत खेळत मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले. हे तिचे ऑलिम्पिकमधील पहिलेच सुवर्ण पदक आहे. मिश्र दुहेरीचा पदक सोहळा आटोपल्यानंतर चीनकडून पुरुष दुहेरीत खेळणाऱ्या लियू युचेनने याकिओंगसमोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केले. यावेळी त्याने खिशातून अंगठी काढली आणि हुआंगला प्रपोज केले. यानंतर तिथे उपस्थित प्रेक्षकांनी आनंदाने उड्या मारल्या आणि टाळ्या वाजवून दोघांचेही अभिनंदन केले.
खरे तर जेव्हा लियू युचेनने गुडघे टेकून लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा हुआंग भावुक झाली. यानंतर हुआंगने होकार देत त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. हुआंग याकिओंग म्हणाली की, तिला पॅरिसमध्ये एंगेजमेंट रिंग मिळण्याची अपेक्षा नव्हती. मी केवळ खेळाच्या तयारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. मी माझ्या भावना शब्दांत मांडू शकत नाही. मी खूप आनंदी आहे, असे ती सांगते.
पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच फेरीत लियू युचेन स्पर्धेबाहेर झाला होता. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. हुआंग याकिओंगलाही टोकियोमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. पण, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लियू आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही पण हुआंगने रौप्यवरून सुवर्ण पदकापर्यंत मजल मारली.