Paris Olympics 2024 Day 6 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील आज गुरुवारचा दिवस भारतासाठी चढ-उताराचा राहिला. दिवसाच्या सुरुवातीला भारतीय खेळाडूंना २० किमी चालण्याच्या स्पर्धेत अपयश आले. तीनपैकी एकही खेळाडू पहिल्या २५ मध्येही आला नाही. त्यानंतर मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने मात्र तमाम भारतीयांना खुशखबर देत कांस्य पदक जिंकले. त्याने ५० मीटर एअर रायफल प्रकारात ४५१.४ गुणांची कमाई केली अन् पदक पटकावले. पण, बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा मलेशियाकडून पराभव झाला. चिराग आणि सात्विकने भारताकडून चांगली कामगिरी केली. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. मलेशियाने हा सामना १-२ असा जिंकला. बॉक्सिंगमध्ये निखत जरीनला पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताच्या पदकाची आशा मावळली.
बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय या दोन भारतीय शिलेदारांचा सामना झाला. अपेक्षेप्रमाणे लक्ष्यने सहज विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. लक्ष्यने पहिल्या गेममध्ये प्रणॉयचा २१-१२ असा पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या गेममध्ये २१-६ ने विजय नोंदवला. लक्ष्यने आपल्या सहकाऱ्याचाच पराभव केल्याने भारत जिंकला आणि हरलाही असे पाहायला मिळाले. तिरंदाजीत भारताला निराशेचा सामना करावा लागला. तसेच मराठमोळा तिरंदाज खेळाडू प्रवीण जाधवला पुढील फेरी गाठता आली नाही. मूळचा सातारचा असलेल्या प्रवीणला ०-६ ने पराभवाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, आज भारताला स्वप्नीलच्या रूपात पदक मिळाले असले तरी पदक अपेक्षांना मोठा धक्का बसला. पदकाचे दावेदार असलेल्या तीन प्रकारात भारतीय शिलेदारांना पराभव पत्करावा लागला. बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागची जोडी पराभूत झाली. बॉक्सिंगमध्ये निखतला वर्ल्ड चॅम्पियन मलेशियन जोडीने नमवले. तसेच नेमबाजीतील महिलांच्या ५० मी थ्री पोझिशनमध्ये सिफ्ट कौर आणि अंजुम मोदगील यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. भारताच्या हॉकी संघाचा विजयरथ रोखण्यात बेल्जियमला यश आले. बेल्जियमने टीम इंडियाचा १-२ असा पराभव केला. बेल्जियम विजयासह अव्वल स्थानी गेला तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने न्यूझीलंड आणि आयर्लंडचा पराभव केला आहे. तर अर्जेंटिनाविरूद्धचा सामना अनिर्णित संपला.