Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी टीमचा सेमीफायनलमध्ये निराशाजनक पराभव झालेला आहे. भारताला हरवून जर्मनीनं फायनलमध्ये धडक दिली आहे. भारतानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला हरवून कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे आजच्या सेमीफायनल सामन्यावर अनेकांचं लक्ष होतं. भारतीय संघ गोल्ड मेडलच्या लढतीसाठी पात्र ठरू शकला नसला तरी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाला कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल.
पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय टीमनं जर्मनीविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली होती. भारतानं पहिल्या क्वार्टरमध्ये ७ पॅनल्टी कॉर्नर मिळवले त्यात १ गोल मारण्यात आला. भारतासाठी हरमनप्रीत सिंगनं पॅनल्टी कॉर्नरमध्ये कुठलीही घाई न करता भारताला आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीतचा हा पॅरिस ऑलिम्पिकमधील आठवा गोल होता. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मिळालेल्या पॅनल्टी कॉर्नरमध्ये भारताविरोधात जर्मनीनं १-१ बरोबरी केली. १८ व्या मिनिटाला गोंजालो पिलाटनं जर्मनीसाठी गोल मिळवून दिला.
त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्येच जर्मनीच्या क्रिस्टोफर रुएहरनं २७ व्या मिनिटाला पॅनल्टी स्ट्रोकवर शानदार गोल मारला आणि जर्मनीला २-१ ने आघाडी घेऊन गेली. भारत आणि जर्मनी यांच्यातील सेमीफायनलमध्ये दुसरा क्वार्टर संपला तेव्हा जर्मनीनं भारताविरोधात २-१ ने आघाडी घेतली होती. त्यानतंर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताकडून सुखजीत सिंगने ३६ व्या मिनिटाला पॅनल्टी कॉर्नरवर गोल मारून २-२ अशी बरोबरी केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या परंतु केवळ एकच गोल यशस्वी झाला.
चौथ्या क्वार्टरची सुरुवात होताच जर्मनीला पॅनल्टी कॉर्नर मिळाला मात्र भारतीय गोलकिपर पीआर श्रीजेशनं जबरदस्त कामगिरी करत गोल रोखला. त्याशिवाय भारतीय डिफेंडर संजयनेही जर्मनीच्या प्रयत्नांना अयशस्वी ठरवलं. त्यानंतर अखेरच्या १५ मिनिटांत जर्मनीनं त्यांचा खेळ आक्रमक केला. चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनं १ गोल यशस्वी केला. ५४ व्या मिनिटांवर जर्मनीच्या मार्को मिल्टकाऊनं गोल केला. त्यामुळे जर्मनीला भारताविरोधात ३-२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर भारतीय टीमनं गोलकिपर पीआर श्रीजेशला मैदानाबाहेर पाठवत राखीव खेळाडूला मॅचमध्ये खेळायला आणले. मात्र अखेरच्या क्षणी जर्मनीनं विजय मिळवला आहे.