Indian Hockey Team, Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीयहॉकी संघाने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली असून पदकापासून एक पाऊल दूर आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनचा शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. भारताच्या डिफेंडरला रेड कार्ड मिळाल्याने भारत १० खेळाडूंसह खेळत होता. तरीही निर्धारित सामन्यात भारताने १-१ अशी बरोबरी राखली. त्यामुळे सामना शूटआउटमध्ये गेल आणि भारत सामना जिंकला.
आता ६ ऑगस्टला भारतीय संघ उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीशी भिडणार आहे. जर्मनीने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा ३-२ असा पराभव केला. दुसरीकडे, पहिल्या उपांत्य फेरीत स्पेनचा सामना नेदरलँडशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत स्पेनने ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियमचा ३-२ असा पराभव केला. तर नेदरलँड्सने ऑस्ट्रेलियाचा २-० असा पराभव केला.
ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम हे दोन बलाढ्य संघ पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. असा योगायोग तब्बल ४४ वर्षांनंतर घडला आहे, जेव्हा बेल्जियम किंवा ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत नसतील. यापूर्वी १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये असा प्रकार पाहायला मिळाला होता. ऑस्ट्रेलियाने त्यावर्षी ऑलिम्पिकवर बहिष्कार घातला होता. तर बेल्जियमचा संघ हॉकी स्पर्धेसाठी पात्रच ठरू शकला नव्हता. त्यावेळी १९८०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. तसाच योगायोग आताही घडून आला आहे, त्यामुळे भारतीय संघाला सुवर्णपदकाची संधी आहे.
मॉस्को ऑलिम्पिक १९८० मध्ये पुरुष हॉकी स्पर्धेत भारताशिवाय यजमान सोव्हिएत युनियन, झेकोस्लोव्हाकिया, झिम्बाब्वे आणि स्पेन या ५ देशांनीच सहभाग घेतला होता. वासुदेव भास्करनच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरीत स्पेनचा ४-३ असा पराभव केला होता. स्पेनला रौप्यपदक तर सोव्हिएत युनियनला कांस्यपदक मिळाले होते. तेव्हापासून आजपर्यंत भारताला हॉकीमध्ये सुवर्ण किंवा रौप्यपदक जिंकता आलेले नाही.