paris olympics 2024 india : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला आतापर्यंत केवळ सहा पदके जिंकता आली आहेत. यामध्ये पाच कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. शुक्रवारी अमन सेहरावतने ५७ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. पण, विनेश फोगाटचा मुद्दा अद्याप गाजत आहे. अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशचे वजन अतिरिक्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे भारताच्या तोंडचा घास गेला अन् तिला आता रौप्य पदक मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. ही लढाई न्यायालयात पोहोचली आहे. एकूणच विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्याने भारताच्या हक्काचे एक पदक गेले.
दरम्यान, उपांत्य फेरीत अमन सेहरावतचा पराभव करून पुढे सुवर्ण पदकाला गवसणी घालणाऱ्या जपानच्या खेळाडूने विनेश फोगाटसाठी भावनिक पोस्ट केली आहे. जपानचा पैलवान हीगुचीने विनेशला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, मी तुझे दु:ख समजू शकतो. तेच ५० ग्रॅम वजन. तुझ्या आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. हे असेच चालू राहते. अपयशातून पुढे येणे ही खूप मोठी बाब आहे. चांगली विश्रांती घे.
खरे तर जपानचा गोल्डन बॉय हीगुची ५० ग्रॅम अधिक वजन असल्याने मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकला नव्हता. त्याच्या मायदेशात झालेल्या या स्पर्धेत सहभागी होऊ न शकल्याने तो खूप निराश होता. पात्रता फेरीत त्याचे ५० ग्रॅम अतिरिक्त वजन निदर्शनास आले होते. मात्र, यावेळी त्याने उपांत्य फेरीत भारताच्या सेहरावतचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि अंतिम फेरीत अमेरिकेच्या खेळाडूचा ४-२ असा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले. उपांत्य फेरीतील पराभवानंतर अमन सेहरावतने कांस्य पदकाच्या लढतीत विजय मिळवून भारताला या ऑलिम्पिकमधील कुस्तीतील पहिले पदक मिळवून दिले.