Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकच्या स्पर्धेला प्रारंभ होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. २६ जुलैपासून सुरू होत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे शिलेदार सज्ज आहेत. एकूण ११७ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. ३३ खेळांमध्ये जगभरातील १० हजारहून अधिक खेळाडू आपले नशीब आजमवतील. येत्या २६ तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होईल आणि ११ ऑगस्टला स्पर्धेचा शेवट होईल. तमाम भारतीय आपल्या खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवत आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीही ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देत आहे. भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीही या स्पर्धेचा भाग आहे, ती १९ महिन्यांच्या मुलीला मायदेशात ठेवून पॅरिसला गेली आहे. (Deepika Kumari On Paris Olympic 2024)
दीपिका कुमारीसह धीरज बोम्मदेवरा, प्रवीण जाधव, तरूणदीप राय, भजन कौर आणि अंकिता भगत हे शिलेदार तिरंदाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. या ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंची अंतिम यादी समोर आली आहे. एकूण ११७ खेळाडू तिरंग्याची शान वाढवण्यासाठी मैदानात असतील. भारतीय खेळाडूंसह १४० सपोर्ट स्टाफचा समावेश आहे, ज्यात ७२ अधिकारी आहेत. खेळाडूंसह सर्व सदस्यांचा शासनाकडून प्रवासाचा खर्च मंजूर करण्यात आला.
आपल्या १९ महिन्यांच्या लेकीला भारतात ठेवून पॅरिसला गेलेली दीपिका चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. दीपिका २०२२ मध्ये एका मुलीची आई झाली. ती अद्याप ऑलिम्पिकमधील तिच्या पहिल्या पदकाच्या शोधात आहे. मुलीपासून इतके दिवस लांब राहणे यामागे किती दु:ख लपले आहे हे शब्दांत मांडू शकत नाही. मी मागील अनेक वर्षांपासून ज्या पदकासाठी मेहनत करत आहे त्यासाठी हा त्याग आहे. मला मुलीची खूप आठवण येते, पण त्याला पर्यायही नाही, असे दीपिका सांगते.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधून भारताला चांगल्या पदकांची आशा असेल. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके जिंकली होती. तेव्हा ११९ खेळाडू मैदानात होते. नीरज चोप्राच्या रूपात भारतात एकमेव सुवर्ण पदक आले. तर दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांनी भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली.