Lakshya Sen Badminton, India in Paris Olympics 2024: भारताच्या लक्ष्य सेनला आज पुरुष एकेरीत उपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने पराभूत केले. लक्ष्यने संपूर्ण सामन्यात चमकदार खेळ केला, परंतु छोट्या चुका त्याला महागात पडल्या. त्यामुळेच एक्सेलसेनने २२-२०, २१-१४ अशा दोन सरळ गेममध्ये सामना जिंकला. लक्ष्य सेन पराभूत झाला असला तरी त्याला अजूनही पदक मिळवता येऊ शकते. उद्या कांस्यपदकासाठी लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या झी जिया ली याच्याशी होणार आहे.
पहिल्या गेममध्ये आघाडीवरून पिछाडी
सेमीफायनलच्या पहिल्या गेमच्या सुरुवातीला लक्ष्य सेनने व्हिक्टर एक्सलसेनवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. एकेकाळी लक्ष्य आणि व्हिक्टर दोघेही बरोबरीत होते, पण काही वेळातच लक्ष्यने व्हिक्टरवर आघाडी घेतली. लक्ष्यने ११ गुण मिळवले तेव्हा व्हिक्टर केवळ ९ गुणांवर होता. लक्ष्य त्यानंतर १८ गुणांपर्यंत पोहोचला. नंतर लक्ष्य काहीचा अडचणीत असल्याचे दिसले आणि व्हिक्टरला आघाडी घेण्याची संधी मिळाली. व्हिक्टरने जोरदार पुनरागमन करत पहिला गेम २२-२० असा जिंकला.
व्हिक्टरविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतर, लक्ष्य सेनने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. लक्ष्यने पहिल्या काही मिनिटांत व्हिक्टरवर ७-० अशी आघाडी घेतली होती. लक्ष्यने ७ गुण मिळवले तेव्हा व्हिक्टरने पहिला गुण मिळवला. पण काही वेळातच सामना पालटला. व्हिक्टर झटपट ८-७ असा पुढे आला. त्यानंतर लक्ष्यने निश्चितच आघाडी घेतली, मात्र व्हिक्टरने पुन्हा स्कोअर १२-१२ असा आणला. त्यानंतर हळूहळू विक्टरने आपली वादळी खेळी सुरु केली आणि २१-१४ असा दुसरा गेमही जिंकला. दुसऱ्या गेम सोबतच विक्टर सलग आपल्या दुसऱ्या ऑलिम्पिक बॅडमिंटन फायनलमध्ये पोहोचला. गेल्या ऑलिम्पिकमध्ये विक्टरने या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.
आता लक्ष्य सेन कांस्यपदकासाठी उद्या मलेशियाच्या खेळाडूशी भिडणार आहे.