Mirabai Chanu in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी बुधवाराचा दिवस हा निराशाजनक ठरला . दिवसाअखेर मीराबाई चानूकडून वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकण्याची अपेक्षा होती, पण तिनेही निराशा केली. क्लीन अँड जर्कच्या शेवटच्या प्रयत्नात मीराबाईला ११४ किलो वजन उचलता आले नाही आणि ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली. मीराबाईच्या पराभवामुळे वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या पदक जिंकण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू ही भारताची एकमेव वेटलिफ्टर होती. पदक हुकल्यानंतर मीराबाईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारताच्या मीराबाई चानूचे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदक एक किलोने हुकले आहे. मीराबाई चानू ४९ किलो वजनी गटात चौथ्या स्थानावर राहिली. २९ वर्षीय मीराबाई चानूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण १९९ किलो वजन उचलले. पदक न जिंकल्याची खंत मीराबाईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आणि ती अचानक भावूक झाली. स्पर्धेनंतर मीराबाई चानूने मात्र तिच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले आणि पदक जिंकण्यासाठी तिने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे म्हटलं. याशिवाय मीराबाई चानूने सांगितले की तिच्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता, त्यामुळे तिला थोडे अशक्तपणा जाणवत होता.
रेव्हस्पोर्ट्ससोबत बोलताना मीराबाई चानूने तिच्या इव्हेंटनंतर याबाबत प्रतिक्रिया दिली."माझ्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता, त्यामुळे मला थोडा अशक्तपणा जाणवत होता आणि यामुळे माझ्या खेळात फरक पडला. पण मी माझे सर्वोत्तम दिले. तरी आजचा दिवस माझा नव्हता," असे मीराबाई चानूने म्हटलं.
मणिपूरच्या मीराबाई चानूने स्नॅचमध्ये पहिल्याच प्रयत्नात ८५ किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात ती अपयशी ठरली आणि तिसऱ्या प्रयत्नात तिने ८८ किलो वजन उचलले. मीराबाई चानू क्लीन अँड जर्कमध्ये तीनपैकी दोन प्रयत्नांमध्ये अपयशी ठरली. तिने आधी १११ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती करू शकली नाही. मीराबाईने दुसरा प्रयत्न केवळ १११ किलोसाठी घेतला आणि यावेळी तिने हे वजन यशस्वीपणे उचलले. स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १११ किलो वजन उचलून मीराबाई चानू चौथ्या क्रमांकावर होती. तिसऱ्या स्थानासाठी तिला क्लीन अँड जर्कमध्ये वजन वाढवणे आवश्यक होते. तिने तिसऱ्या प्रयत्नात ११४ किलो वजन उचलण्याचा निर्णय घेतला, पण पहिल्या प्रयत्नाप्रमाणेच यावेळीही ती अपयशी ठरली. तिसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरल्याने ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न भंगले.
दरम्यान, मीराबाई चानूने गेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले होते. मीराबाईने २०२ किलो (८७ किलो आणि ११५ किलो) वजन उचलून रौप्य पदक जिंकले. टोक्यो ऑलिम्पिकनंतर २०२२ च्या राष्ट्रकुल खेळात तिने सर्वोत्तम कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाईने २०१ किलो (८८ किलो आणि ११३ किलो) वजन उचलले होते.