Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले. पण, शूटिंगमधून एक आशावादी बातमी समोर आली आहे. भारताची शूटर मनू भाकर पहिल्या तीनमध्ये येऊन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता ती अंतिम फेरीत खेळेल. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत मनू भारतासाठी पदक जिंकेल अशी आशा आहे.
मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. सातत्य दाखवत तिने नेमबाजी करताना तिसरे स्थान पटकावण्यात यश मिळवले. अव्वल स्थानी राहिलेले आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र होतात. मनूला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले मात्र, भारताची दुसरी नेमबाज रिदम संगवानच्या पदरी निराशा पडली अन् तिला १५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारताला पदकाची आशा
मनू भाकर मागील २० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. शेवटच्या वेळी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या सुमा शिरूरने २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
दरम्यान, भारताच्या मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ती ५८० गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. रविवारी भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता मनू भाकरचे पदकासाठी लढेल. तर भारताची दुसरी नेमबाज रिदिमा सांगवान ५७३ गुणांसह १५व्या स्थानी राहिली.